Nashik MLC Election : नाशिक पदवीधरमध्ये मोठा ट्विस्ट, सत्य'जीत' रिंगणात

ब्युरो टीम : नाशिक पदवीधर निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठी नाट्यपूर्ण घडामोड घडली आहे. काँग्रेसने उमेदवारी देऊनही डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरलाच नाही. तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

स्वतःच्या मुलासाठी डॉ. सुधीर तांबे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचं जाहीर करत सत्यजीत तांबे यांच्यासारख्या नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचे जाहीर केले.  सत्यजीतकडे व्हिजन आहे. गेली २० वर्ष तो संघटनेत काम करतोय. आताही तो चांगला काम करेल, असा विश्वास डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला. दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडूनच मला उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता. परंतु काही तांत्रिक कारणांनी ते शक्य झालं नसल्याने माझा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे. ही जागा बिनविरोध करण्यासाठी मी सगळ्याच पक्षांच्या नेत्यांना विनंती करणार आहे. विधान परिषदेच्या अनेक जागांच्या निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत. मागची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ही जागा देखील बिनविरोध करावी, अशी विनंती मी सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना भेटून करणार असल्याचं सत्यजीत तांबे यांनी सांगितलं. तर, दुसरीकडे भाजपकडून धनंजय जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सत्यजित तांबे म्हणाले...

मी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवावी, असा काँग्रेसमधील अनेकांचा आग्रह होता. पण पक्षाने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. तांत्रिक अडचणीमुळे शेवटच्या क्षणी मी दोन उमेदवारी अर्ज भरले, एक काँग्रेसचा होता, एक अपक्ष होता. परंतु, माझ्या नावाचा एबी फॉर्म न मिळाल्याने मला अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी लागेल. मी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार आहे, मी आजपर्यंत काँग्रेसच्याच विचारावर काम केले आहे. मी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना भेटणार आहे आणि विनंती करणार आहे. राजकीय पक्षाच्या विचारसरणीच्या,सीमांच्या पलीकडे या निवडणुकीत सर्वांनी माझ्या पाठिशी उभे राहावे, अशी माझी अपेक्षा आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने