ब्युरो टीम : अहमदनगरच्या नामांतरावरून राजकारण दिवसेंदिवस तापत आहे. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नामांतराला विरोध केलाय. तर, नगरच्या नामांतराची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलीय. आता या वादात आहिल्यदेवी होळकर यांचे वंशज आणि विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी उडी घेतली असून त्यांनी नामांतर आणि विभाजन याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
आमदार शिंदे यांनी सोमवारी अहमदनगरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘मी नगर जिल्ह्याचा पालकमंत्री असतानाच जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव पाठविला होता. त्यासाठी पाठपुरावाही सुरू आहे. आता ही विभाजन आणि नामांतराची प्रकिया पुन्हा वेग घेत आहे. ज्यावेळी राज्यात जिल्ह्यांच्या विभाजनाचा निर्णय होईल, त्यात अहमदनगरला प्राधान्य असेल. सोबतच जिल्ह्याचं नामांतरण हे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर’ असं केलं जाईल.’
जिल्ह्याचे विभाजन आणि नामांतरासंबंधी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मागणीला खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोध असल्याकडे लक्ष वेधलं असता शिंदे म्हणाले, ‘विखे पाटील जेव्हा विरोधीपक्ष नेते होते, तेव्हा त्यांचा विभाजनाला पाठिंबा होता. आता ते सत्तेत आहेत. त्यांनी त्यांची भूमिका बदलू नये. नामांतराची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. पक्षाकडून सूचना आल्यानंतर सर्वांचा एक सूर होईल. पडळकर यांनी पूर्वीच मागणी केली होती, त्यावेळी त्यांनी माझ्याशी चर्चा केली होती. आताही आम्ही सर्व मिळून, सर्व संमतीने हा मुद्दा पुढं नेणार आहोत. अर्थात लोकशाहीत प्रत्येकाला स्वतंत्र मत मांडण्याचा आधिकार आहे. सध्या विखे पाटील असं का बोलतात हे मला माहिती नाही, मात्र यावर नक्कीच सर्व सहमती होऊन नगरचं विभाजन आणि नामांतरही नक्कीच होईल,’ असेही प्रा. शिंदे म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा