ब्युरो टीम : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे ट्विटरवर खूप ऍक्टिव्ह असतात. अनेकदा एखाद्या राजकीय नेत्याचा वाढदिवस असेल, तर त्याला शुभेच्छा देण्यासाठीही ते ट्विटरचा वापर करतात. बऱ्याचदा संबंधित नेता विरोधी पक्षाचा अर्थात भाजपचा असला तरीही ते शुभेच्छा देण्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत. मात्र काल, त्यांनी भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांना ट्विटरवर शुभेच्छा न दिल्याने याची चांगली चर्चा आता सुरू आहे.
विधान परिषदेचे आमदार भाजप नेते प्रा. राम शिंदे यांचा काल वाढदिवस झाला. अनेकांनी त्यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. परंतु ट्विटरचा वापर करून बहुतांश राजकीय नेत्यांना शुभेच्छा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी शिंदे यांना ट्विटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्याने त्याची राजकीय वर्तुळ चर्चा सुरू आहे. राम शिंदे व रोहित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष लपून राहिलेला नाही. शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत पवार यांनी पराभव केला होता. त्या दिवशी पवार शिंदे यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यानंतर ही मात्र शिंदे व पवार यांच्यामधील राजकीय संघर्ष कायम राहिला. हे दोघेही सातत्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतच राहिले. त्यातच भाजपने शिंदे यांना विधान परिषदेवर संधी देऊन पवार यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी मिळाल्यानंतर शिंदे हे रोहित पवार यांचे विरोधात अधिकच आक्रमक झाले आहे. त्यातच आता राज्यातही भाजपचा सहभाग असलेले सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे पवार यांना अडचणीत आणण्याचा शिंदे हे नेहमीच प्रयत्न करत असतात. त्यामुळेच आमदार रोहित पवार यांनी प्रा. राम शिंदे यांना ट्विटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा