ब्युरो टीम : 'महाराष्ट्राच्या क्रिकेटला मोठी परंपरा आहे. अनेक नामवंत खेळाडू या क्षेत्रात होऊ गेले. सुनील गावसकर, कपिल देव, रवी शास्त्री, सचिन तेंडूलकर अशा दिग्गजांची परंपरा आहे. मात्र, क्रिकेटशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तीची केवळ कोणा बड्या नेत्याचा नातेवाईक म्हणून थेट निवड होणे हे धक्कादायक आणि क्रिकेटसाठी नुकसानकारक आहे,' असे वक्तव्य करतानाच भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर तोफ डागली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात असताना मतदारसंघातील त्यांचे प्रतिस्पर्धी प्रा. राम शिंदे यांनी मात्र ही निवड धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. क्रिकेटच्या परंपरेला धोका पोहचविणारी आणि नुकसान करणारी ही निवड असल्याचे ते शिंदे म्हणाले.
दरम्यान, आमदार शिंदे आणि आमदार पवार यांच्यात अलीकडे टोकाची राजकीय स्पर्धा वाढली आहे. एकमेकांच्या कामाचे श्रेय घेण्यावरून, कार्यकर्ते फोडण्यावरून त्यांच्यात आरोपप्रत्यारोप होत असतात. अलीकडे एका व्यासपीठावर येणेही ते टाळतात. एवढेच नव्हे तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देणेही टाळले जाऊ लागल्याचे दिसून येते.
टिप्पणी पोस्ट करा