ब्युरो टीम : राजकारणातील 'चाणक्य' अशी ओळख असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणासोबतच क्रिकेट विश्वातही तितकेच अॅक्टिव्ह दिसतात. आता आजोबांपाठोपाठ त्यांचा नातू म्हणजेच आमदार रोहित पवार यांची देखील क्रिकेटच्या मैदानात एंट्री झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार क्लब गटाकडून विजयी झाले होते. त्यानंतर रोहित पवार यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीनंतर आज पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर असोशिएशनच्या कमिटीची बैठक पार पडली. यात रोहित पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत सर्वांचे आभार मानले आहेत. रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटल आहे की, 'एमसीएच्या सदस्यपदी निवडून दिल्याबद्दल सर्व सदस्य क्लबचं आणि अध्यक्षपदी निवडून दिल्याबद्दल एमसीएच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार. आदरणीय पवार साहेबांनी अनेक वर्षे खेळासाठी भरीव कामगिरी केली आहे. त्यांचं मार्गदर्शन, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा पाठिंबा, तसंच एमसीएचे अनेक मा. अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांचीही या निवडीसाठी मोलाची मदत झाली. उपाध्यक्षपदी निवड झालेले माझे सहकारी किरण सामंत,सचिव शुभेंद्र भांडारकर, खजिनदार संजय बजाज व सह सचिव संतोष बोबडे यांचंही अभिनंदन. माजी अध्यक्ष अजय शिर्के आणि रियाज बागवान यांचंही मोठं सहकार्य लाभलं. क्रिकेट नेहमीच माझ्या आवडीचा खेळ राहीलाय. आता एमसीएच्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंसाठी काम करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. सर्वांना सोबत घेऊन खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील. पुनश्च सर्वांचे आभार!'
टिप्पणी पोस्ट करा