Satyajeet Tambe : कोण आहेत सत्यजीत तांबे?

ब्युरो टीम : महाविकास आघाडीकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसला देण्यात आली. काँग्रेसनेही डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी घोषित केली. सुधीर तांबे काँग्रेसकडून तीनवेळा या मतदारसंघातून निवडून आले होते. काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्याच नावाने एबी फॉर्म आला, मात्र, ऐनवेळी सुधीर तांबेंनी आपली उमेदवारी मागे घेत मुलगा सत्यजीत तांबे यांचा अर्ज दाखल केला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सत्यजीत तांबे या नावाची चर्चा सुरू झाली आहे. चला तर, सत्यजीत तांबे यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास कसा आहे, ते जाणून घेऊ.

सत्यजीत तांबे यांचा राजकीय प्रवास

सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसमध्ये विद्यार्थी नेता म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २००० पासून ते काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयमध्ये सक्रीय होते. एनएसयूआयमध्ये सत्यजीत तांबे यांनी चांगली कामगिरी केल्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात देखील काम केलं.

अहमदनगर जिल्हा परिषदेचे २००७ आणि २०१२ च्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून सत्यजीत तांबे यांनी काम केलं आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत देखील सत्यजीत तांबे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

युवक काँग्रेसचे अध्यक्ष

सत्यजीत तांबे यांनी एनएसयुआयनंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये काम केलं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून तांबे यांना २०११ आणि २०१४ मध्ये संधी मिळाली होती. पुढील काळात सत्यजीत तांबे यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचं अध्यक्षपद आलं होतं. सत्यजीत तांबे यांच्याकडे युवक काँग्रेसचं अध्यक्षपद आल्यानंतर त्यांनी राज्यभर युवकांचं संघटन केलं होतं. युवक काँग्रेसमार्फत त्यांनी राबवलेलं चलो पंचायत अभियान चर्चेत आलं होतं.

पुस्तकाचे प्रकाशन

सत्यजीत तांबे हे जयहिंद युवा मंचच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. नगररचना, नागरी व्यवस्थापन यासंदर्भातील त्यांचं सिटीझनविल हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. सेंटर फॉर इंडिया इंटरनॅशनल रिलेशन्स या संस्थेचे ते अध्यक्ष देखील आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने