ब्युरो टीम : बिग बॉस फेम आणि अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाही. उर्फीने आज एक फोटो ट्वीट केला आहे. त्यावर तिने चित्रा वाघ यांना टॅग करत लिहलं की, 'लेकिन अभी बोहोत सुधार बाकी है. सॉरी चित्रा वाघ जी. आय लव्ह यू.' तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये, 'मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू,' असं उर्फीने म्हटलं आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.
उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद थांबायचं सोडून जास्तीत जास्त चिघळताना दिसत आहे. दरदिवशी चित्रा पत्रकार परिषद घेऊन त्यांचा मुद्दा मांडताना दिसतात. तर उर्फीही आपल्या ट्वीटद्वारे किंवा इन्स्टाग्राम स्टोरीमधून त्यांना प्रत्यूत्तर देताना दिसते. सुरुवातीला सर्वांना हे शित युद्ध वाटत होतं, मात्र आता हा वाद जास्तच पेटताना दिसत आहे.
चित्रा वाघ यांनी तोकड्या कपड्यांवरून उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत मुंबई पोलिसांना पत्रही देण्यात आलं. तसेच, उर्फीने असाच नंगानाच सुरु ठेवला तर तिचं थोबाड फोडणार, अशी आक्रमक भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली आहे.
'उर्फी जावेद समोर आली, तर तिचं थोबाड फोडणार आहे. पण, थोबाड फोडण्याआधी तिला साडी चोळीही देऊ. त्यानंतरही तिनं नंगानाच सुरु ठेवला, तर तिचं थोबाड फोडणार,' असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं. त्यातच आता उर्फीने ट्वीट करत चित्रा वाघ यांना डिवचलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा