विक्रम बनकर, नगर : सोलापूरमध्ये एका शेतकऱ्याला ५१२ किलो कांदा विकल्यावर १ रुपयाप्रमाणं दर मिळाला होता. त्यापैकी मोटारभाडे, हमाली, तोलाई याचे ५०९ रुपये वजा होऊन संबंधित शेतकऱ्याला केवळ २ रुपयांचा चेक मिळाला होता. यावरून विरोधी पक्षाकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू झाला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही याप्रकारावरून केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते नगरमध्ये बोलत होते.
‘बार्शी येथील शेतकऱ्याला कांदा विकल्यानंतर आडत खर्च जाऊन दोन रुपयांचा चेक मिळाला. शेतकऱ्याची ही बिकट स्थिती सरकार उघड्या डोळ्यानं बघतय, पण भूमिका घेत नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत केंद्र व राज्य सरकार नुसत्या खोटारड्या घोषणा करीत त्यांना रडवत आहे,’ असा घणाघातही दानवे यांनी केला.
‘कांद्याच्या बाबतीत खरोखरच बिकट परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे,’ असे सांगत दानवे पुढे म्हणाले, ‘कांदा, कापूस, संत्री असेल यासर्व ठिकाणी सरकारचे धोरण परस्पर विरोधी आहे. एकीकडे कांद्याची निर्यात करण्याची मागणी केल्यानंतर सरकार कांद्याची निर्यात करीत नाही. तर, दुसरीकडे कापूस आयात करणे बंद करा म्हंटले तरीही सरकार कापूस आयात करते. सरकारचे हे धोरण परस्पर विरोधी आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.
शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतरही जाग नाही
दरम्यान, यावेळी विरोधीपक्षनेते दानवे यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला. ते म्हणाले, ‘मागील वर्षी जुन्नर येथील एका शेतकऱ्याने कांदाला भाव मिळत नाही म्हणून पंतप्रधानाच्या वाढदिवशी पत्र लिहून आत्महत्या केली. पण त्यानंतरही सरकार जागेवर आले नाही. कापसाची स्थितीही त्यापेक्षा काही वेगळी नाही.’
पहा व्हिडिओ
टिप्पणी पोस्ट करा