ब्युरो टीम: माजी
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये
येण्याची ऑफर दिली होती. यावर बोलताना राज्याच्या राजकारणात माझे सगळ्याच पक्षात
मित्र आहेत. मात्र आमची विचारधारा वेगळी आहे. विखे पाटील हे देखील माझे मित्र
आहेत. पण त्यांची ऑफर मला मान्य नाही.
विखे पाटील यांनी मला दिलेली ही ऑफर पाहता ते माझे मित्र आहेत की शत्रू असा
प्रश्नही उपस्थित होत असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते
म्हणाले की, राधाकृष्ण विखे पाटील
यांनी जे वक्तव्य केलं त्यामागे काँग्रेसमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा हेतू आहे का? अशी शंका आपल्याला येत असल्याचं चव्हाण यांनी
म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना
अशोक चव्हाण यांनी सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीवर देखील प्रतिक्रिया दिली
आहे. राज्यातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला होणार आहे. वारंवार
सुनावणी पुढे ढकलल्या जात असल्यानं उशिराने दिलेला न्याय हा न्याय नाकारण्यासारखे
होऊ नये, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील
यांनी अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. काँग्रेसमध्ये आता काही
राहिलं नाही. काँग्रेसचं भविष्य काय आहे? आता अशोक चव्हाण यांनी
विचार करायला हवा. अशोक चव्हाण हे सक्षम नेते आहेत. सगळ्या जगाने मोदीचं नेतृत्व
स्विकारलं आहे, असं म्हणत विखे पाटील यांनी थेट अशोक चव्हाण यांना
भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली.
टिप्पणी पोस्ट करा