AUSW vs SAW Final: 'वर्ल्ड कप'साठी आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका भिडणार



ब्युरो टीम : महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ आज, रविवार (२६ फेब्रुवारी)  ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे.  सलग तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियन संघ मैदानात उतरेल. तर, दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच अंतिम सामना खेळत आहे. त्यामुळे हा संघ चाहत्यांना त्यांच्या घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकून आनंद साजरा करण्याची संधी देण्याचा प्रयत्न करेल.

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६:३० वाजता खेळवला जाईल. नाणेफेक संध्याकाळी ६ वाजता होईल. दरम्यान, स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे महिला टी-२० विश्वचषकाचे सामने प्रसारित करण्याचे अधिकार आहेत.त्यामुळे  हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह पाहू शकता. तसेच भारतातील हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.

दरम्यान, महिला क्रिकेटमध्ये नेहमीच ऑस्ट्रेलियन संघाचा दबदबा राहिला आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने महिला टी-२० विश्वचषक पाच वेळा जिंकला असून सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.  दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ इतिहास रचण्याच्या इराद्याने या स्पर्धेत खेळतोय.  दोन्ही संघ उत्कृष्ट लयीत आहेत. अशा स्थितीत अंतिम सामन्यात निकराची लढत होण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने