ब्युरो टीम : मा
गील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यात वाद सुरू आहे. दोन्ही नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. गिरीश महाजन यांच्यामुळेच भाजपात एकनाथ खडसे यांची मुस्कटदाबी झाली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना गिरीश महाजनांचे कट्टर विरोधक एकनाथ खडसे यांनी मोठं विधान केलं आहे.
मुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजन सर्व निकषांमध्ये बसत असतील तर माझा त्यांना पाठिंबा असेल, अशा आशयाचं विधान खडसे यांनी केलं. माझा खानदेश सुजलाम सुफलाम् झाला पाहिजे, येथील मंजूर झालेले प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत. हे काम करून देणारा माझा कट्टर शत्रू असला तर माझा त्याला पाठिंबा असेल, असं वक्तव्य खडसे यांनी केलं. ते जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी खडसे म्हणाले, “सुरेश दादा जैन हे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी मी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. मला जो मुख्यमंत्री पाहिजे, तो कार्यक्षम, चांगला, दूरदृष्टी आणि सामाजिक हित जपणारा पाहिजे. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने त्याने केलेल्या आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेतला, तर त्यांचं स्थान वरचं असलं पाहिजे. अशा निकषांमध्ये बसणारा माणूस मला मुख्यमंत्री म्हणून पाहिजे. या निकषांमध्ये गिरीश महाजन बसत असतील, तर मला काहीही अडचण नाही. या भागातील प्रकल्प मंजूर करण्यासाठी कुणीही तयार झाला, तर त्या व्यक्तीला माझा पाठिंबा आहे.”
आपल्या परिसरात विद्यापीठ, पशुवैद्यकीय महाविद्यालय यासह सिंचनासाठी निधी मिळावा. खानदेशाच्या विकासासाठी पैसा मिळावा. आपला परिसर सुजलाम् सुफलाम् व्हावा, असं स्वप्न आम्ही वर्षानुवर्षे पाहत आलो आहोत. ज्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली, ते प्रकल्प पूर्ण करावेत, अशी आमची अपेक्षा आहे. हे काम करणारा नेता माझा कितीही कट्टर शत्रू असला तरी मुख्यमंत्री पदासाठी माझा त्यांना पाठिंबा असेल, असं मत खडसेंनी व्यक्त केलं
टिप्पणी पोस्ट करा