कसब्या च्या अपक्ष उमेदवाराला राहुल गांधींचा फोन? चर्चा मात्र सत्यजित तांबेची

 



ब्युरो टीम
: कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेस ने उमेदवारी न दिल्याने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या बाळासाहेब दाभेकरानी  आज आपला  उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतु अर्ज मागे घेण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा फोन आला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. परंतु या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.  नाशिक पदवीधर निवडणुकीच्या वेळी राहुल गांधींनी सत्यजित तांबेना असा फोन का केला नाही? असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.


महाराष्ट्रमध्ये गेल्या महिनाभरापासून नाशिक पदवीधर विधानपरिषद मतदार संघाची जोरदार चर्चा होती. या मतदारसंघात काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे व प्रदेश युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी न करता अपक्ष अर्ज भरला, व ते निवडून येत आमदार  झाले. सत्यजित तांबे यांना राहुल गांधींचे निकटवर्तीय समजले जाते. विशेष म्हणजे राहुल गांधी हे संगमनेर येथेही आले होते. मात्र जेव्हा सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत नाशिक पदवीधर विधानपरिषद मतदारसंघात अपक्ष अर्ज भरला, तेव्हा त्यांना राहुल गांधी यांनी संपर्क केला नाही का? असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे.

दुसरीकडे सत्यजित तांबे यांनी विधानपरिषद निवडणूक जिंकल्यानंतर नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप केले होते. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात व तांबे यांच्या कुटुंबीयांना दूर केले जात आहे, असेही ते म्हणाले होते. त्यातच आता कसबा पोटनिवडणूक देखील काँग्रेस मधून बंडखोरी करीत अपक्ष उभ्या राहिलेल्या उमेदवाराला थेट अर्ज मागे घेण्यासाठी राहुल गांधी यांनी फोन केल्याने पुण्यातील निवडणूक चर्चेत आली आहे. मात्र पोट निवडणुकीला उभ्या राहिलेल्या अपक्ष उमेदवाराला राहुल गांधी फोन करतात, मग अपक्ष विधानपरिषद निवडणूक लढवणाऱ्या सत्यजित तांबेंना का फोन करीत नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत असून  यावरून जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने