अ‍ॅड. उदय शेळके यांचे निधन, दोन मोठ्या बँकांच्या अध्यक्षपदाची होती जबाबदारी

 


ब्युरो टीम : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जीएस महानगर बँकेचे चेअरमन अ‍ॅड. उदय शेळके (वय- ४६) यांचे दिर्घाजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी ११ वाजता पिंप्री जलसेन (ता. पारनेर) येथे अंत्यविधी होणार आहे.

अ‍ॅड. शेळके यांना काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा तिव्र झटका आला होता. त्यांच्यावर पुणे येथे खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील लिलावती रूग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका आला. त्यामुळे गेले पाच महिने ते बेशुद्धावस्थेतच होते. लिलावती रूग्णालयात परदेशी डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले. मात्र त्यात यश आले नाही. शनिवारी त्यांनी उपचारास प्रतिसाद देणे बंद केले. त्यानंतर दोन वाजता त्यांचे निधन झाल्याचे हॉस्पीटलने अधिकृत जाहीर केले.

(स्व.) सॉलिसीटर गुलाबराव शेळके यांचे ते चिरंजीव होते. (स्व.) गुलाबराव शेळके यांचेही निधन हृदयविकारानेच झाले होते. त्यांच्यानंतर अ‍ॅड. उदय शेळके यांनी जीएस महानगर बँकची धुरा सर्थपणे सांभाळली. दीड वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली. पारनेर सोसायटी मतदारसंघातून त्यांनी मोठ्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकली. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अ‍ॅड. उदय शेळके यांच्या नावावर शिक्काोर्तब केले. महानगर बँकेतील त्यांच्या कामाची पद्धत पाहूनच त्यांना ही संधी देण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी जिल्हा बँकेला आर्थिक शिस्त लावण्यासाठी काम केले. एकाच वेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जीएस महानगर बँका या दोन बलाढ्य बँकांचे अध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे पेलली. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने