Chinchwad Kasba Peth : कसबा-चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार? अजित पवारांनी विषयच संपवला!



ब्युरो टीम : कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. ते पुणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 'कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचे काही कारण नाही. भाजपने कोल्हापूर, आणि पंढरपूरची पोटनिवडणूक बिनविरोध केली नाही. त्याचबरोबर देगलूरची निवडणुकही बिनविरोध झाली नाही. एक मुंबईची निवडणूक बिनविरोध झाली. बाकीच्या पोटनिवडणुका बिनविरोध होतील, हे त्यांनी डोक्यातून काढाव. शेवटी लोकशाही आहे. जनतेला हवं त्याला ते निवडून देतील,' असेही अजित पवार म्हणाले.

'आताच्या पाच विधान परिषदेत मोठा झटका बसला आहे. सत्ताधाऱ्यांनी कितीही आव आणला तरी येत्या काही दिवसात महाविकास आघाडीचा प्रभाव दिसून येईल, हे त्यांनाही माहिती आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही सत्ताधारी पक्षाला झटका बसण्याची भावना त्यांच्या मनामध्ये आली आहे. निवडणूक म्हंटली की कोणाचा तरी विजय होतो, कोणाचा तरी पराभव होतो. अपयशाने खचायाचं पण नसतं आणि यशाने हुरळून पण जायचं नसत,' असा टोलाही अजित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे.

दरम्यान, कसबा आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या दोन्ही जागांवरील निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपा तसेच शिंदे गटाकडून प्रयत्न केला जात आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांशी याबाबत चर्चा केली आहे. मात्र आता अजित पवार यांनी या पोटनिवडणुकीबाबत मांडलेली भूमिका पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास संपली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने