Crime Murder Case : क्रौर्याचा कळस! पती व सासूची केली हत्या, मृतदेहाचे तुकडे करून फेकले दरीत



ब्युरो टीम : आसाम राज्यात माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य घडलयं. येथील गुवाहाटी येथे प्रियकर व मित्राच्या मदतीनं एका महिलेनं पती व सासूची हत्या केली, व त्यानंतर या दोघांच्या शरीराचे बारिक तुकडे करून ते मेघालय राज्यात जाऊन फेकून दिले. या घटनेचा उलगडा करण्यास पोलिसांना तब्बल सात महिन्यानंतर यश आलं.

श्रद्धा वालकर खून प्रकरण असो की अंजन दास हत्या प्रकरण, या दोन्ही प्रकरणानंतर देशाची राजधानी दिल्ली हादरली होती. तर, झारखंडमधील रेबिकाच्या हत्येचं प्रकरणही खूपच धक्कादायक होतं. या तिन्ही प्रकरणात फसवणूक, खून आणि मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवणे, अशा विविध गोष्टींमध्ये साम्य होतं.  पण आता आसाम राज्यातील असा दुहेरी हत्याकांडाचा प्रकार समोर आलाय, ज्यानं पोलिसांनाही धक्का बसलाय. आसाममधील अमरज्योती डे (वय 32) आणि शंकरी डे ( वय 62) या दोघांची निर्घुन हत्या करण्यात आली. त्यानंतर दोघांच्या शरीराचे बारिक तुकडे करून ते दरीमध्ये फेकून देण्यात आले. 'आजतक'ने याबाबत वृत्त दिलंय.

नेमका काय आहे प्रकार?

आसाममधील गुवाहाटीमध्ये वंदना कलिता नावाची महिला 29 ऑगस्ट 2022 रोजी पोलीस स्टेशनला आली होती. तिनं पोलिसांना सांगितलं की, ‘माझा पती अमरज्योती डे आणि सासू शंकरी डे हे अचानक गायब झालेत. त्या दोघांचा खूप शोध घेतला, पण ते सापडले नाहीत.’ वंदनाच्या तक्रारीची नोंद घेत पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला.  या घटनेचं गूढ उकलण्यासाठी पोलीस बरीच धावपळ करत होते, मात्र कोणताही ठोस पुरावा हाती लागत नव्हता. त्यातच नोव्हेंबर 2022 मध्ये अमरज्योती यांचा चुलत भाऊ पोलीस ठाण्यात आला, व त्यांनी या दोघांच्या गायब होण्याबाबत नवीन तक्रार दिली. यामध्ये त्यांनी हे दोघं बेपत्ता होण्यामागे वंदना कलिता असल्याचा संशय व्यक्त केला होता. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांच्या तपासाची दिशाच बदलली, व तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले. वंदना कलीता हिनेच तिच्या दोन साथीदारांच्या मदतीने हे खून केल्याचे समोर आले.

पोलीस उपायुक्त (मध्य) दिगंत कुमार चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना मयत अमरज्योती डे यांच्या चुलत भावानं वंदना कलिता हिच्यावर व्यक्त केलेल्या संशयाचा धागा पकडत तपास सुरू केला होता. पोलिसांनी अमरज्योती डे आणि वंदना कलिता यांच्या मोबाइलवर येणाऱ्या व जाणाऱ्या कॉल आणि एसएमएसवर लक्ष ठेवलं, व दोघांच्या मोबाइलचे सीडीआरही मिळवले. यानंतर सीडीआर, मोबाइल लोकेशन आदी तपासताना पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले. त्यानंतर अखेर घटनेनंतर तब्बल सात महिन्यांनी या खुनाचा उलगडा झाला. अमरज्योती डे आणि त्यांची आई शंकरी डे यांचा खून करणारा दुसरा कोणी नसून अमरज्योती डे यांची पत्नी वंदना कलिता हिच होती.  तिने तिचा प्रियकर आणि मित्रासोबत मिळून हे धक्कादायक कृत्य केलं होतं.’

हत्या करून शरीराचे तुकडे केले आणि...

पोलीस उपायुक्त दिगंत चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मयत शंकरी डे आणि त्यांचा मुलगा मयत अमरज्योती डे दोघेही वेगवेगळ्या घरात राहत होते. आरोपी महिला वंदना हिनं 26 जुलै 2022 रोजी गुवाहाटी भागातील चांदमारी येथे प्रथम तिची सासू शंकरी डे यांची हत्या केली, त्यानंतर मृतदेहाचे छोटे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले. तर, 17 ऑगस्ट 2022 रोजी गुवाहाटी येथील नारेंगी येथेच वंदनानं तिच्या दोन साथीदारांसह पती अमरज्योती डे यांची हत्या करून मृतदेहाचे छोटे तुकडे केले.’

पती व सासूच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं आव्हान वंदनासमोर होतं.  पोलिसांना पुरावा हाती लागू नये, यासाठी आरोपींनी मृतदेहाचे केलेले तुकडे हे आसामऐवजी शेजारचं राज्य मेघालयात फेकून देण्याचं ठरवलं. त्यानुसार आरोपींनी मृतदेहाचे तुकडे पॉलिथिन बॅगमध्ये ठेवले, आणि नंतर ते दोन पिशव्यांमध्ये भरून  आरोपी वंदना, तिचा प्रियकर आणि मित्र असे तिघेही मेघालय राज्याच्या सीमेकडे रवाना झाले. मेघालय राज्याच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर या तिघांनी मृतदेहाच्या तुकड्यांनी भरलेल्या पिशव्या एका खोल दिरत फेकून दिल्या.

आरोपींनी चौकशीत दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आता दोन्ही मृतदेहांचे काही तुकडे जप्त केलेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी(19 फेब्रुवारी 2023) चेरापुंजीजवळ खासी हिल्समध्ये शंकरी डे यांच्या मृतदेहाचे काही भाग सापडलेत. मात्र उर्वरित सर्व तुकड्यांचा शोध सुरू आहे.'

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने