Elections In Chinchwad Kasba Peth : कसबा, चिंचवड भाजपचे उमेदवार जाहीर, निवडणूक बिनविरोध होणार का?



ब्युरो टीम :भाजपाने पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर कसबापेठ येथील पोटनिवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कसबा आणि चिंचवड या दोन मतदारसंघांतील आमदारांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी मोठा खल केल्यानंतर आज भाजपकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली. कसब्यातून हेमंत रासने हे तर चिंचवडमधून अश्विनी जगताप या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. भाजपने उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या गोटातही हालचालींना वेग आला असून कसबा आणि चिंचवडच्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार द्यायचा, हे आघाडीच्या नेत्यांकडून निश्चित झाल्याची माहिती समोर येतेय.

दरम्यान, पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने