Journalist Attack : पत्रकारांवर वारंवार होणार्‍या हल्ल्यांचा येथे करण्यात आला निषेध



ब्युरो टीम रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे वरिष्ठ पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली हत्या, राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारांवरील हल्ले व खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने शुक्रवारी (दि.10 फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध नोंदवून जोरदार निदर्शने करण्यात आली. पत्रकारांनी काळ्या फिती लावून जोरदार घोषणाबाजी केली.

पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या व राज्यातील पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्याच्या संदर्भात सर्व पत्रकार, संघटनांना बरोबर घेऊन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम.  देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, प्रदेश अध्यक्ष शरद पाबळे, राज्य सरचिटणीस मन्सूरभाई शेख यांच्या  मार्गदर्शनाखाली शुक्रवारी राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या अनुषंगाने शहरातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कठोर भूमिका घेण्याची शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पत्रकारांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना दिले. 
या आंदोलनात मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे, विजयसिंह होलम, श्रीराम जोशी, बंडू पवार, महेश देशपांडे, आबिद दुल्हेखान, शिरीष कुलकर्णी, अन्सार सय्यद, नविद शेख, समिर शेख, उदय जोशी, संतोष आवारे, सुशील थोरात, साजिद शेख, यतिन कांबळे, शुभम पाचारणे, मुकुंद भट, वाजिद शेख, शब्बीर सय्यद, आबिद शेख, आफताब शेख, सुर्यकांत वरकड, रवी कदम, लैलेश बारगजे, लहू दळवी, परिषदेचे दक्षिण जिल्हा सचिव महादेव दळे आदी सहभागी झाले होते.
सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो, पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय, पत्रकार संरक्षण कायदा आहे, मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात निर्धाकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भिंतीची भावना निर्माण झाली असल्याचे यावेळी उपस्थित पत्रकार म्हणाले.
राजापूर (जि. रत्नागिरी) येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी कोदवली येथून आपल्या दुचाकीने जात होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने त्यांना धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, शशिकांत वारीसे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. वारीसे यांनी ज्याच्या विरोधात बातमी प्रसिध्द केली, ते कारचालक पंढरीनाथ आंबेरकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारीसे यांच्या गाडीला जोरदार धडक देतो, त्यात वारिशे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला खूनच असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या घटनेची सुनावणी फास्टट्रॅक (जलदगती न्यायालयामार्फत) कोर्टामार्फत व्हावी, हत्या झालेले पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

तर, उग्र आंदोलन करावे लागेल

राज्यातील पत्रकारांचा विविध पध्दतीने आवाज बंद करण्याचा होत असलेला प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारा नाही. केज, मुखेड, धुळे आदि ठिकाणी राज्यात गेल्या आठ दिवसात पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या किमान आठ घटना घडल्या आहेत. वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे थांबले नाही, तर राज्यातील पत्रकारांना उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला आला. तसेच राज्यात पत्रकारांना मुक्तपणे आपले काम करण्यासारखे वातावरण तयार करण्याची सरकारची जबाबदारी आहे. त्यादृष्टीनं भविष्यात प्रयत्न करण्याची अपेक्षा पत्रकारांनी यावेळी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने