Kantara:‘कांतारा’ची पुन्हा हवा; दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळणार रिषभ शेट्टीला विशेष पुरस्कार

 


ब्युरो टीम: २०२२ हे वर्षं कन्नड चित्रपटसृष्टीसाठी खास होतं. ‘केजीएफ २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला अन् पाठोपाठ आलेल्या ‘कांतारा’ या चित्रपटाने रेकॉर्ड मोडून एक वेगळाच इतिहास रचला. सुरुवातीला फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला नंतर हिंदी आणि इतर भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आलं. या चित्रपटामुळे रिषभ शेट्टी रातोरात स्टार झाला. जानेवारी महिन्यात ‘कांतारा’ने चित्रपटगृहात १०० दिवस पूर्ण केले.

नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘कांतारा’ चित्रपटाचं कौतुक केलं होतं. त्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते अभिनेत्रींची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर असताना यश, रिषभ शेट्टी, अश्विनी पुनीत राजकुमार आणि विजय किरागांडूर यांची त्यांनी भेट घेतली. बंगळुरूमधील राजभवनात ही भेट झाली. आता यापाठोपाठ ‘कांतारा’चा दिग्दर्शक आणि अभिनेता रिषभ शेट्टी यांना आणखी एक सन्मान मिळाला आहे.

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार सोहळा येत्या २० फेब्रुवारीला पार पडणार आहे. मुंबईच्या आलीशान ‘ताज लँड्स एंड’ या हॉटेलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. ‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार याच सोहळ्यात रिषभ शेट्टीला ‘मोस्ट प्रॉमिसिंग अभिनेता’ म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. २०१९ मध्ये हा पुरस्कार ‘केजीएफ’फेम अभिनेता यशला देण्यात आला होता.

नुकतंच रिषभने ‘कांतारा’च्या प्रीक्वलची घोषणा केली आहे. ‘कांतारा’ हा फक्त १६ कोटीच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे, पण याला मिळालेलं यश आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता याच्या प्रीक्वलसाठी जास्त बजेटसह हा चित्रपत आणखी भव्य पद्धतीने सादर करणार असल्याची चर्चा होत आहे. रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ने बॉक्स ऑफिसवर ४५० कोटी एवढी कमाई केली. आता पुढील वर्षी येणाऱ्या ‘कांतारा २’साठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने