kasaba peth : मुख्यमंत्र्यांनी केला आचारसंहितेचा भंग; विरोधकांचा गंभीर आरोप

 


ब्यूरो टीम: पुण्यात काल (रविवारी) पिंपरी-चिंचवड व कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं.या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून मात्र  मतदानानंतरही येथील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. भाजपा उमेदवार हेमंत रासने यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

शनिवारी ( २५ फेब्रुवारी ) कसबा पेठेत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता. त्यानंतर ते उपोषणास बसले होते. आचारसंहिता सुरु असताना कसबा गणपती समोर उपोषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच आता रवींद्र धंगेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत.

‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं की, “निवडणूक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री ८ वाजेपर्यंत पैसे वाटत फिरत होते. चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकरही पोलिसांच्या उपस्थितीत फिरत होते. माझ्यावर गुन्हा दाखल केला, मग त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. हा पक्षपातीपणा कशा करायला हवा.”

“मुख्यमंत्र्यांनी ज्या घरात पैसे वाटले, ते घर माझं आहे. पण, निवडणूक यंत्रणा ही भाजपाचं कार्यालय झालं आहे. हेमंत रासनेंनी म्हटलं कसबा हा भाजपाचा गढ आहे. मात्र, हा जनतेचा गढ आहे. ही लढाई धनशक्ती आणि जनशक्तीची होती. जनशक्तीच्या मागे जनता होती. धनशक्तीच्या मागे ज्यांनी पैसे घेतले, ते होते. काही लोकांनी पैसे घेतले आणि मत धंगेकरांना देणार असं सांगितलं. परंतु, १५ ते २० हजार मतांनी माझा विजय होणार आहे,” असा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने