Kasba Bypoll : कसबा निवडणुकीतील त्या व्हिडिओची का होतेय चर्चा? वाचा



ब्युरो टीम : पुण्यातील कसबा पेठ पोट निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत काल, गुरुवारी झालेल्या सभेतील एका व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा आहे. या निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अल्पसंख्याक समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत काँग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांनी केलेलं एक वक्तव्य वादात सापडलं आहे. विशेष म्हणजे या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय?

बैठकीमध्ये उस्मान हिरोली यांनी उपस्थितांना मोठ्या संख्येने मतदारांना मतदानासाठी आणण्याचं आवाहन केलं. मात्र, हे आवाहन करताना त्यांनी केलेलं विधान वादात सापडलं. ते म्हणाले, ‘२६ तारखेला मतदान आहे. जेवढे लोक दुबईला गेले असतील, सौदीला गेले असतील, त्या सगळ्यांना हजर करा आणि सगळ्यांचं मतदान करून घ्या. ज्या लोकांचा मृत्यू झालाय त्यांनाही २६ तारखेला हजर करा आणि सगळ्यांना मतदान करायला लावा. आपण हे युद्ध तेव्हाच जिंकू शकतो, आरएसएस आणि मोदींना तेव्हाच हरवू शकतो जेव्हा आपण पुढे येऊन मतदान करू. आपल्याला ९९ टक्के नाही, १०० टक्के मतदान हवंय.’

हिरोली यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिरोली यांच्या या वक्तव्यावरून भाजपानं टीकेची झोड उठवली आहे. सध्या प्रचारासाठी पुण्यात असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर खोचक टीका केलीय. ते म्हणाले, ‘शरद पवारांच्या मेळाव्यात त्यांचे नेते जातीयवादी टिप्पणी करतात. मेलेल्या लोकांना मतदानासाठी आणा म्हणतात. त्यामुळे कसब्यातली लढाई ३७० कलम हटवले म्हणून छाती पिटणाऱ्यांविरोधात राष्ट्रीय विचारांच्या लोकांची आहे.’

पहा व्हायरल व्हिडिओ



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने