ब्युरो टीम : कुस्तीमध्ये
देशाला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणाऱ्या आणि जागतिक दर्जाचे पैलवान राहिलेल्या
खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा निर्णय
नागराज मंजुळे यांनी घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील
उमळवाडमध्ये महाशिवरात्री यात्रेनिमित्त आयोजित भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी
मैदानात नागराज मंजुळे यांनी हजेरी लावली होती. दरम्यान, याच कुस्तीच्या
मैदानातून नागराज मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा
बनवण्याची घोषणा केली. आता या सिनेमाची
चाहत्यांना आणि कुस्तीप्रेमींना उत्सुकता आहे.
आमिर खानचा 'दंगल' हा सिनेमा गेल्या
काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता गावच्या लाल मातीत खेळलेला
आणि देशासाठी पहिलं आंतरराष्ट्रीय पदक मिळवणारा लाल मातीतला मराठी माणूस म्हणजेच, खाशाबा जाधव
यांचं आयुष्य रुपेरी पडद्याच्या माध्यमातून जगासमोर यावं यासाठी नागराज मंजुळे हा
सिनेमा बनवणार आहेत.
नागराज मंजुळे म्हणाले, "खाशाबा जाधव हे जागतिक किर्तीचे आणि दर्जाचे पैलवान होते. त्यामुळे
त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर सिनेमा
बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. लवकरच मी
यासंदर्भात माहिती देईल. या सिनेमाचं शूटिंगदेखील कोल्हापुरात होऊ शकतं. या
सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना तो काळ अनुभवायला मिळणार आहे".
टिप्पणी पोस्ट करा