Medical Tests Before Wedding : लग्न ठरवताय ? मग 'या' मेडिकल टेस्ट कराच



ब्युरो टीमसध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. भारतात अनेक रितीरिवाजांनी विवाह केले जातात. अनेकजण मुलगा आणि मुलगी यांच्या पत्रिका जुळल्यानंतरच लग्न ठरवतात. याशिवाय लग्न ठरवताना मुला-मुलीची वागणूक, अनुकूलता इत्यादी अनेक गोष्टी पाहिल्या जातात. पण एक गोष्ट आहे, ज्याकडे सहसा कोणी लक्ष देत नाही. ती गोष्ट म्हणजे मेडिकल फिटनेस. लग्नाआधी काही मेडिकल टेस्ट (Medical Tests Before Wedding) करून घेतल्यास जोडप्यामधील नाते घट्ट आणि निरोगी बनते.

जर तुम्हीही लग्न करून तुमचे संपूर्ण आयुष्य एखाद्यासोबत घालवण्याचे स्वप्न पाहत असाल, तर त्याआधी तुमच्या जोडीदाराचे मेडिकल स्टेटस जाणून घेणे, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून येणाऱ्या नवीन आयुष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. चला तर मग लग्नापूर्वी प्रत्येकाने त्याच्या जोडीदाराच्या कोणत्या 4 मेडिकल टेस्ट करून घेणे आवश्यक आहे ते पाहुयात.

अनुवांशिकता चाचणी :  ही चाचणी लग्नापूर्वी जोडप्यांनी करून घेतली पाहिजे. अनुवांशिक रोग सहजपणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाऊ शकतात. अशा परिस्थितीत लग्नापूर्वी अनुवांशिकता चाचणी करून घेणे आवश्यक आहे. अनुवांशिक आजारांमध्ये स्तनाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग, किडनीचे आजार आणि मधुमेह यांचा समावेश होतो. हे आजार लवकर आढळून आल्यास त्यावर वेळीच उपचार करता येतात जेणेकरून पुढे कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

वंध्यत्व चाचणी : ही चाचणी लग्नापूर्वी पुरुषांनी शुक्राणूंची स्थिती आणि संख्या तर स्त्रियांनी अंडाशयाचे आरोग्य जाणून घेण्यासाठी करणे खूप महत्वाचे आहे. कारण वंध्यत्वाशी संबंधित कोणतीही लक्षणे शरीरात आधीपासूनच दिसत नाहीत, ही माहिती केवळ चाचणीद्वारे प्राप्त होते. जर तुम्ही भविष्यात बेबी प्लानिंग किंवा तुमच्या नॉर्मल सेक्सुअल लाइफसाठी नियोजन करत असाल तर ही चाचणी खूप महत्त्वाची आहे.

रक्त गट चाचणी : ही चाचणी फार महत्त्वाची चाचणी वाटत नसली तरी तुम्हाला भविष्यात कुटुंब नियोजन करायचे असेल, तर ही चाचणी करून घ्यावी. तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा रक्तगटाचा आरएच घटक समान असणे महत्त्वाचे आहे. जर तुमच्या दोघांचा रक्तगट एकमेकांना अनुकूल नसतील, तर पत्नीला गर्भधारणेदरम्यान खूप त्रास सहन करावा लागू शकतो.

एसटीडी चाचणी : ही चाचणी लग्नानंतर लैंगिक संक्रमित रोगांची लागण होऊ नये, यासाठी करणे अत्यंत महत्वाचे आहे. आजच्या काळात लग्नापूर्वी सेक्स करणे सामान्य झाले आहे. अशा परिस्थितीत, लैंगिक संक्रमित रोगांची लागण होऊ नये,  यासाठी ही चाचणी घेणे महत्वाचे आहे. या आजारांमध्ये एचआयव्ही, एड्स, गोनोरिया, नागीण, हेपेटायटीस सी यांचा समावेश होतो. हे काही आजार आहेत जे असुरक्षित सेक्स संबंधातून पसरतात. यापैकी बहुतेक रोग प्राणघातक ठरू शकतात. त्यामुळे ही चाचणी करून तुमच्या जोडीदाराचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर तुम्ही भविष्यात येणाऱ्या मोठ्या अडचणी टाळता येतील.

 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने