Nana Patole : बैठक काँग्रेसची, चर्चा होतेय मांजरीची, काय आहे नेमका प्रकार? वाचा



ब्युरो टीम : कसबा आणि चिंचवड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आज पुण्यातील काँग्रेस भवन येथे बैठक झाली. मात्र या बैठकीसोबतच काँग्रेस भवनांमध्ये आलेल्या एका मांजरीची जोरदार चर्चा आता सुरू आहे. याबाबतचा व्हिडिओ ही व्हायरल झाला आहे. ही मांजर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना आडवी जाऊ नये, म्हणून काँग्रेसच्या पुणे येथील पदाधिकाऱ्यांनी धडपड तर केली नाही ना? असे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ही वाटेल.

आज पुण्यातील काँग्रेस भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांसोबत बैठक झाली. मात्र, बैठकीसाठी नाना पटोले हे काँग्रेस भवन येथे काही मिनिटांत पोहोचणार, अशी माहिती शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांना मिळाली. त्यानंतर अरविंद शिंदे हे सहकार्‍यासह गेटवर जाऊन थांबले. त्यादरम्यान नाना पटोले यांचे आगमन झाले. नाना पटोले यांचे सर्वांनी स्वागत केल्यावर ते पुढे काही पावले चालत होते तेवढ्यात एक मांजर नाना पटोले यांच्या मार्गामध्ये आडवी जाण्याची शक्यता होती. हे ओळखून शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची मांजरीला बाजूला करण्याची एकच धडपड पाहण्यास मिळाली.

दरम्यान, हे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला असून तो धुमाकूळ घालत आहे. काही जणांकडून याला काँग्रेसची अंधश्रद्धा म्हटले आहे, तर काहींनी हा निव्वळ योगायोग असल्याचे म्हंटले आहे. या प्रकाराची मात्र राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने