ब्युरो टीम :पुणे शहरासाठी महत्त्वकांशी ठरणाऱ्या मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित पुणेरी चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली होती. महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांतील मिळून २५ हजार ८२३ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यापैकी १८ विद्यार्थ्यांची पारितोषिकासाठी निवड झाली आहे. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार असून त्याची तारीख, ठिकाण व वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांपैकी सर्वोत्कृष्ट चित्राचे राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शन भरविण्यात आले होते. १३ आणि १४ फेब्रुवारी दरम्यान पुणे येथील हयात हॉटेलमध्ये राष्ट्रीय पातळीवरील 'रिव्हर सिटी अलायन्स' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार यांच्या सूचनेनुसार हे चित्र प्रदर्शन भरविण्यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ.मीनाक्षी राऊत यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
तीन गटांमध्ये झाली स्पर्धा
पुणेरी चित्रकला स्पर्धा ही पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटांमध्ये घेण्यात आली. स्पर्धेसाठी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘नदीकाठी माझं घर’, पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘जीवनदायिनी नदी’ आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘माझ्या स्वप्नातील मुळा-मुठा’ असे विषय देण्यात आले होते. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र पारितोषिक ठेवण्यात आले होते. तसेच पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व पुणे महानगरपालिका शाळा वगळून इतर शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पारितोषिक ठेवण्यात आले होते. त्यानुसार विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.
विविध उपक्रमांचे आयोजन
मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत पुणे शहरातील नागरिकांना माहिती मिळावी, प्रकल्पाबाबत असणाऱ्या त्यांच्या शंका दूर व्हाव्यात, यासाठी पुणे महानगरपालिका महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवत असून वेगवेगळ्या स्पर्धा देखील घेत आहे. यामध्ये रिल्स, फोटोग्राफी, इमोजी, मेमोरीज् अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. या सर्व उपक्रमांची माहिती www.punere.in या संकेतस्थळावर देण्यात आली असून या संकेतस्थळावरून नागरिकांना स्पर्धेत थेट सहभागी होता येणार आहे. तरी जास्तीतजास्त नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
चित्रकला स्पर्धेचा असा आहे निकाल (शाळेचे नाव)
महानगरपालिका शाळा
गट – पहिली ते चौथी
प्रथम - भोला एम विश्वकर्मा (शाळा क्रमांक ७४ जी, ईएम पौंड फाटा)
द्वितीय – गौतम आर शर्मा (शाळा क्रमांक १६१ इंग्लिश मीडिअम)
तृतीय – किर्ती वाघमारे (शाळा क्रमांक १२८ बी कोथरुड)
गट – पाचवी ते सातवी
प्रथम- अक्षरा ए पहिलवान (विद्या निकेतन - १४)
द्वितीय – आकांशा के थोरात (शाळा क्रमांक १ जी बिबवेवाडी)
तृतीय – साहिल के मोहम्मद (शाळा क्रमांक ९१ जी धनकवडी)
गट – आठवी ते दहावी
प्रथम – ओम ए बरुंदे (विद्या निकेतन २० पाषाण)
द्वितीय – आदित्य व्ही घाटकांबळे (विद्या निकेतन २० पाषाण)
तृतीय – अविनाश ए कसबे (व्ही.एस.खांडेकर १२५ - बी)
महानगरपालिका शाळा वगळून इतर शाळा:
गट – पहिली ते चौथी
प्रथम – स्वराज पी सकट (एसएसपीएमएस स्कूल)
द्वितीय – अबुबकर एस अत्तर (फ्र. अँगल विद्यांकुर)
तृतीय – वेदांत वाय नांगरे (गोलवलकर गुरुजी शाळा)
गट – पाचवी ते सातवी
प्रथम- स्वराज एल केंडाळे (आनंद विद्या निकेतन)
द्वितीय – सृष्टी एस मेधाणे (भारती विद्यापीठ ईएम)
तृतीय – कार्तिकी एन गायकवाड (मॉर्डन हायस्कूल)
गट – आठवी ते दहावी
प्रथम – नंदिनी एन ढोरे (फ्र. अँगल विद्यांकुर)
द्वितीय – सोमजीत एल साहू (मॉर्डन हायस्कूल एनसीएल)
तृतीय – यशदा एस शिलोळे (एचएससीपी हुजूर पागा पुणे ३०)
टिप्पणी पोस्ट करा