Raj Thackeray : राज ठाकरेंची मोक्याची क्षणी लिहिलं पत्र, कसबा चिंचवड पोटनिवडणुकीबाबत म्हणाले...



ब्युरो टीम : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींचं निधन झाल्याने या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा वेगळी भूमिका घेतली आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांना केलं आहे. तसे पत्रही त्यांनी लिहिले आहे.

राज ठाकरेंच्या पत्रातील प्रत्येक शब्द वाचा... 

"सस्नेह जय महाराष्ट्र,

महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांचं नुकतंच दुःखद निधन झालं. या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणुका होत आहेत.

मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी.

कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही.

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली.

आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वांना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा."

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने