Rohit Pawar : रोहित पवारांचा भाजपावर हल्लाबोल, म्हणाले 'सत्ता, पैसा, गुंडगीरी आणि दबाव...'



ब्युरो टीम : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार हल्लाबोल केलाय. 'सत्ता, पैसा, गुंडगीरी आणि दबाव याचा उतमात चिंचवड आणि कसब्यात लोकांनी भरदिवसा अनुभवला...,' असे ट्विट रोहित पवारांनी केले आहे.

कसबा पेठ व चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून संपूर्ण ताकदीने प्रचार करण्यात आला. दोन्ही बाजूंचे प्रमुख नेते या पोटनिवडणुकांसाठी पुण्यात ठाण मांडून होते. त्यामुळे कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुका चुरशीच्या होण्याची शक्यता आहे. यामध्ये कसब्याची लढत भाजपसाठी अधिक प्रतिष्ठेची आहे. कसब्यातील प्रचारासाठी भाजपने केंद्रीय गृहमंत्र्यांपासून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांना प्रचारात उतरवले होते. त्यामुळे आज कसबा आणि पुण्यातील मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकणार, याची सर्वांना उत्सुकता होती. आज मतदानाच्या  दिवशी या दोन्ही मतदारसंघात अनेक घडामोडी घडल्या. काही ठिकाणी भाजप व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्यात वादाची परिस्थिती निर्माण झाली होती.  त्यातच आता मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच रोहित पवार यांनी भाजपवर ट्विटरवरून जोरदार हल्लाबोल केला आहे.

रोहित पवार आपल्या ट्विट मध्ये म्हणतात...

'सत्ता, पैसा, गुंडगीरी आणि दबाव याचा उतमात चिंचवड आणि कसब्यात लोकांनी भरदिवसा अनुभवला... आशा करूयात २ मार्च रोजी लोकशाही तरेल... मात्र यंत्रणेला दाबून वेगळ्या प्रकारचा निकाल लागला तर अशा प्रकारचं घातक राजकारण महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीला आणि विकासाला मारक ठरेल...,' असे रोहित पवारांनी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

दरम्यान,राजकीय पक्षांकडून कधी नव्हे इतका जोरदार प्रचार झाल्याने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीतील मतदानाचा टक्का किती असणार, याची उत्सुकताही सर्वांना लागली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने