Satyajeet Tambe : 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? सत्यजीत तांबेंनी सगळेच सांगितलं



ब्युरो टीम : संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर सत्यजीत तांबे ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. या निवडणुकीनंतर आज तांबे यांनी पत्रकार परिषदेत नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याआधीचा घटनाक्रम सांगितला.

सत्यजीत तांबे म्हणाले.....

'निवडणुकीचा अर्ज भरण्याचा १२ जानेवारी हा शेवटचा दिवस होता. त्याच्या दोन दिवस आधी माझा माणूस नागपूरला प्रदेश कार्यालयात गेला होता. आम्ही कोरे एबी फॉर्म देण्याविषयी नाना पटोले यांच्याशी चर्चा केली होती. माझा माणसून १० जानेवारीला सकाळपासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत प्रदेश कार्यालयात बसून राहिला. त्यानंतर नाना पटोले यांनी त्याच्याकडे सीलबंद लिफाफ्यात दोन एबी फॉर्म देत असल्याचे सांगितले. हे एबी फॉर्म घेऊन माणसू ११ जानेवारीला नाशिकमध्ये पोहोचला. त्यानंतर आम्ही उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात केली. त्यासाठी आम्ही लिफाफा फोडला तेव्हा त्यामध्ये चुकीचे एबी फॉर्म होते. एक कोरा एबी फॉर्म हा नागपूर शिक्षक मतदारसंघ आणि दुसरा एबी फॉर्म औरंगाबाद मतदारसंघाचा होता. याबाबत आम्ही प्रदेश कार्यालयाला कळवले तेव्हा नवा एबी फॉर्म पाठवण्यात आला. त्यावर डॉ. सुधीर तांबे यांचे नाव लिहले होते. तर दुसऱ्या उमेदवाराच्या रकान्यात 'नील' असे लिहले होते, जेणेकरुन त्याठिकाणी माझे नाव लिहता येऊ नये. हे सगळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी घडत होते. त्यावेळी मी एच. के. पाटील यांना फोन केले, परंतु, त्यांनी माझा एकही फोन उचलला नाही. तर नाना पटोले यांचा फोन बंद होता. त्यामुळे मी इंडियन नॅशनल काँग्रेसच्या नावाने फॉर्म भरला, पण एबी फॉर्म नसल्याने तो अपक्ष म्हणून कन्व्हर्ट झाला, अशा खुलासा सत्यजीत तांबे यांनी केला.

या सगळ्याची स्क्रिप्ट आधीच लिहली होती. एबी फॉर्मबाबत ठरवून गोंधळ घालण्यात आला. माझ्या वडिलांनी निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले होते. तरीही शेवटच्या दिवशी १२.३० वाजता दिल्लीतून माझ्या वडिलांचे नाव जाहीर करण्यात आले. विधानपरिषदेच्या इतर कोणत्याही उमेदवाराचे नाव दिल्लीतून जाहीर झाले नव्हते. मग ही एकच उमेदवारी दिल्लीतून का जाहीर झाली?, असा सवाल सत्यजीत तांबे यांनी विचारला. हे सर्व बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी आणि तांबे परिवाला काँग्रेसबाहेर ढकलण्यासाठी रचलेले कारस्थान होते, असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने