ShivSena Symbol : धनुष्यबाण पेलायलाही मर्द लागतो, उद्धव ठाकरे कडाडले



ब्युरो टीम : 'ज्या पद्धतीने आपले शिवसेना हे नाव चोराला दिले. आपला पवित्र धनुष्यबाण हा चोराला दिला. ज्यांनी धनुष्यबाण चोरला ते मर्द असतील तर त्यांनी चोरलेला धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत यावं. मी मशाल घेऊन तुमच्यासमोर उभा राहतो. बघुया काय होतं तर. धनुष्यबाण पेलायलाही मर्द लागतो. रावणाने शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो उताणा पडला होता. तसेच हे चोर आणि चोरबाजाराचे मालक शिवधनुष्य पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाहीत,' असा घणाघात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर  उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाविरोधात आक्रमक पवित्रा धारण केला आहे. आज त्यांनी शिवसैनिकांशी संवाद शाधला आहे. जीपमध्ये उभे राहून साधलेल्या या संवादात त्यांनी शिंदे गटाला थेट आव्हान दिले आहे. मर्द असाल तर चोरलेला धनुष्यबाण निवडणूक चिन्ह घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरा. मी मशाल घेऊन येतो. कोण जिंकतो ते बघुया, असे खुले आव्हान ठाकरे यांनी दिले आहे.

'मी कुठेही खचलो नाही. कुठेही खचणार नाही. माझी ताकद तुम्ही आहात. तुमच्या ताकदीच्या जोरावर मी उभा आहे. ही ताकद जोपर्यंत माझ्यासोबत आहे, तोपर्यंत असे कितीजरी चोर आणि चोरबाजाराचे मालक आले तरी त्यांना गाडून त्यांच्या छातीवर शिवरायांचा भगवा फडकवण्याची ताकद आमच्या मनगटात आहे,' असेही ठाकरे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने