ब्युरो टीम : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याचा महत्त्वपूर्ण निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल म्हणजे सत्याचा, लोकशाहीचा तसंच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या निकालानंतर राज्यभरात ठिकठिकाणी एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांकडून जल्लोष करण्यात येत आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी या सगळ्यावरून निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु असताना पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून घोषणा करावी की ७५ वर्षांचं स्वातंत्र्य संपलंय आणि देशातली लोकशाही संपवून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात केली आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसंच या निर्णयाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरचा फोटो बदलला आहे. भगव्या बॅकग्राऊंडवर धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव असलेला फोटो एकनाथ शिंदे यांनी प्रोफाईल फोटो म्हणून ठेवला आहे.
निवडणूक आयोगाने 78 पानांचा निकाल दिला आहे, या निकालात शिवसेनेचा इतिहासच बदलला गेला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला मोठ्या प्रमाणावर प्रतिज्ञापत्र देण्यात आली होती, पण निवडणूक आयोगाच्या निकालात आमदार आणि खासदार कुणाकडे हाच कळीचा मुद्दा ठरला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 55 पैकी 40 आमदार आणि 13 खासदार गेले, याशिवाय प्रतिनिधीसभेतही बहुमत आपल्या बाजूने आहे, असा दावा शिंदेंकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आला होता
टिप्पणी पोस्ट करा