Abdul Sattar : अब्दुल सत्तार म्हणतात, विखे पाटलांकडे सर्वांची लगाम



ब्युरो टीम : शिर्डी येथील महापशुधन एक्स्पो या कार्यक्रमात बोलताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्री राधाकृष्ण विखेंबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 'विखे पाटील यांच्याकडे सर्वांची लगाम आहे. त्यामुळं नगर जिल्ह्यात सर्व काही ठीक सुरू आहे,'असे ते म्हणाले आहेत.

सत्तार पुढे म्हणाले, 'मागील सरकारमध्ये राज्यमंत्री असताना विखे यांच्या सोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे तत्कालीन मुख्यमंत्र्याना पटत नव्हते. मला वेळोेवेळी त्या बाबत ते टोकत होते. मात्र आमची मैत्री ही कायम ठेवली. आता सगळ्या गोष्टी एकत्र येवून राज्यात सत्तांतर झाले. आमचे सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही शेतकरी, पशुपालक तसेच सर्वांसाठी महत्वाचे निर्णय घेतले. आता गारपीट झाली असून पंचनामे झाले आहेत. मदतीची घोषणा करून एक महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.' असे यावेळी सत्तार यांनी सांगितले.

तर, याप्रसंगी उपस्थित असलेले खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, 'महाएक्सोचा फायदा पशुपालकांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. देशाच्या १२ राज्यातून ८९ विविध प्रजातीचे पशू प्रदर्शनासाठी आले आहे, हे सर्व आपल्याला पहावयास मिळणार आहे. याचा आनंद आपण घ्यावा. तीन दिवसात या महाएक्सपोत विविध प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत याचाही लाभ घ्यावा.'

या कार्यक्रमात पशुसंर्धन विभागाने पशुपालन बाबत तसेच विविध प्रजातीची माहिती डायरीत एकत्रित करून या डायरीचे विमोचन यावेळी करण्यात आले. महाएक्सपो कार्यक्रमास शेतकरी, पशुपालक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने