Ahmednagar : राष्ट्र सेवा दलाचे विठ्ठल बुलबुले यांचे निधन


ब्युरो टीम : राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल अंभी बुलबुले (वय ५०) यांचे सोमवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या निधनाने विविध संघटनांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
बुलबुले यांचा गत आठवड्यात अपघात झाला होता. त्यांच्या डोक्याला जखम झाली होती. आज दुपारी त्रास झाल्याने त्यांना अगोदर जिल्हा रुग्णालयात व नंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी कल्पना, मुलगी अवनी (वय १६), मुलगा अबीर (१२) दोन विवाहित भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
बुलबुले यांनी उमेदीच्या काळात राष्ट्र सेवा दलाचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून सुमारे सात वर्षे काम केले. त्यासाठी ते देशभर फिरले. सेवा दलातील बा.य.परीट गुरुजी, भाई वैद्य यांच्यासोबत त्यांनी काम केले. मेधा पाटकर यांच्यासमवेत ते नर्मदा बचाव आंदोलनातही सहभागी होते. ज्येष्ठ समाजवादी नेते एस.एम. जोशी यांच्यावर त्यांनी एक पुस्तकही प्रकाशित केले. प्रतिज्ञेवर आधारित ‘भारत माझा देश’ या विषयावर त्यांनी शाळांमधून एक हजारहून अधिक व्याख्याने दिली.
नगर शहरात त्यांनी राष्ट्र सेवा दलाचे जुने कार्यकर्ते किसनराव अरकल व डॉ. एस.पी. महाले यांच्या स्मरणार्थ कार्यकर्ता पुरस्कार सुरु केले होते. पद्मशाली समाजातील जात पंचायतीतील अनिष्ट प्रथांविरोधातही त्यांनी संघर्ष केला. ‘यशदा’च्या माध्यमातून माहिती अधिकारातील तज्ज्ञ म्हणून त्यांनी राज्यभर व्याख्याने दिली. जिज्ञासा ॲकेडमीच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्व विकासाचे धडे दिले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘सावित्री-फातिमा’ पुरस्कारांची परंपरा त्यांनी नगरमध्ये सुरु केली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी दवाखान्यात धाव घेतली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने