Ahmednagar : 'या' जिल्ह्यात ११ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश



विक्रम बनकर, नगर :  अहमदनगर जिल्ह्यात २९ मार्च ते ११ एप्रिल या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. याकाळात साजरे होणारे सण, उत्सव, जयंती तसेच पोलीस भरती परीक्षा पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अन्वये जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या आदेशानुसार हे आदेश जारी करण्यात आलेत.

अहमदनगर शहर व संपूर्ण  जिल्ह्याहद्दीत  सण व उत्सव, सभा, आंदोलने, यामुळे  गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरील पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही किरकोळ घटना वरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी संपूर्ण अहमदनगर शहर व जिल्ह्यात २९ मार्च ते ११ एप्रिल २०२३ या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश असताना शस्त्रे, काठया, तलवारी भाले, सुरे, बंदुका, दंडे अगर लाठया किंवा शारिरीक इजा करणेसाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे व साधने जवळ बाळगणे किंवा तयार करणे किंवा जमा करणे, कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे, सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल किंवा शांतता धोक्यात येईल, असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशामध्ये शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पुर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींसाठी हे आदेश लागू राहणार नाहीत, असे ही सालीमठ यांनी प्रतिबंधात्मक आदेशात नमूद केलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने