ब्युरो टीम : गुढी पाडव्याच्या दिवशी मनसेचा भव्य मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवर मैदानावर झाला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरही भाष्य केलं. आता राज ठाकरेंच्या मेळाव्यातील भाषणावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विट करीत राज ठाकरेंच्या भाषणावर खोचक टीका केलीय. मिटकरींनी राज ठाकरेंचा उल्लेख हास्यसम्राट करीत मनसेला डिवचले आहे.
मनसेच्या मेळाव्यावर ट्विट करताना मिटकरी म्हणतात...
आपल्या ट्विटमध्ये मिटकरींनी राज ठाकरेंचा उल्लेख हास्यसम्राट असा केलाय. 'धन्य ते हास्यसम्राट आणि धन्य त्यांची हास्यजत्रा..महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही देणघेणे नसलेले हास्यसम्राट ६ जूनला रायगडावर जाणार असं समजलं, पण हे महाशय गड चढून जाण्याची हिंमत करतील का?' अशी खोचक टीका त्यांनी केली. तसेच गड चढायला मावळ्याचं काळीज असावं लागतं, कावळ्याची टीवटीव नव्हे, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे. 'समजा हे भावी मुख्यमंत्री झालेच तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांऐवजी विधीमंडळात भोंगे, हनुमान चालीसा, दर्गा यावर चर्चा ऐकायला मिळतील. मुसलमान किती वाईट असतात, हे भावी मुख्यमंत्री सांगतील,' असेही मिटकरींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
दरम्यान, गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह विविध राजकीय विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवरदेखील तोफ डागली. राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका करू ठेवलाय, असं ते म्हणाले. याबरोबरच त्यांनी शिवराज्यभिषेक दिनाला म्हणजेच ६ जून रोजी रायगडावर जाणार असल्याचंही सांगितलं.
टिप्पणी पोस्ट करा