ब्युरो टीम : 'शिर्डी येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देशातील सर्वात मोठे राष्ट्रीय स्तरावरील 'महापशुधन एक्सपो २०२३' चे आयोजन २४ ते २६ मार्च दरम्यान करण्यात आले आहे, ' अशी माहिती महसूल राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
या प्रदर्शनाच्या संदर्भात माहिती देताना पशुसंवर्धनमंत्री विखे पाटील म्हणाले की, 'देशातील १३ राज्यातील पशुपक्षी सहभागी व्हावेत असा प्रयत्न आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाचे महत्त्व पटवून देवून देशी गोवंशामध्ये अनुवंशिक सुधारणा घडवून आणणे, सुशिक्षित बेरोजगारांना पशुपालनाद्वारे स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यायोगे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे, दूध, मांस, अंडी उत्पादनास चालना देणे, जनावारांची उत्पादन क्षमता वाढवून उत्पादन खर्च कमी करणे, लिंग विनिश्चित केलेल्या विर्यमात्राचा कृत्रिम रेतन कार्यक्रमात वापर, वैरण उत्पादनास चालना देणे, मुरघास हायड्रोपोनिक अझोला तंत्रज्ञान यासारख्या विषयांबाबत पशुपालकांना प्रात्यक्षिकांसह या प्रदर्शनात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे पशुपालकांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल.'
'शास्त्रोक्त पध्दतीने पशुपालन करण्यासाठी आवश्यक यंत्रे उपकरणे तसेच पशुसंवर्धनाशी निगडीत बाबीसाठीच्या उत्पादनाचे स्टाॅल सुमारे ४६ एकराच्या क्षेत्रामध्ये उभारण्यात येणार असून,६५ प्रकारच्या विविध पशुपक्ष्याच्या जाती या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.नागपूर येथील महाराष्ट्र पशु विज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचा यामध्ये सक्रीय सहभाग राहाणार असून या प्रदर्शनाच्या निमित्ताने पाच लाख शेतकऱ्यांचा सहभाग या प्रदर्शनात राहील,' असेही विखे पाटील यांनी सांगितले.
'महापशुधन एक्स्पो 'हा पशुसंवर्धन विषयातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि शास्त्रोक्त पध्दतीने पशु-पक्षी पालन करण्यासाठी या व्यवसायात नव्याने येत असलेल्या युवकांना पर्वणी ठरेल.
टिप्पणी पोस्ट करा