BJP : ईशान्येत भाजपची लाट



ब्युरो टीम : ईशान्येकडील तीन राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्रिपुरा आणि नागालॅण्डमध्ये भाजप आणि मित्रपक्षांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तर,  मेघालय विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. राज्यात त्रिशंकू परिस्थिती झालीय. या राज्यात भाजपला दोनच जागा मिळाल्या असल्यातरी त्या बहुमतासाठी निर्णायक ठरणार आहेत. या तिन्ही राज्यात गुरुवारी मतमोजणी झाली. दुसरीकडे, तिन्ही राज्यांत काँग्रेसला पुन्हा अपयश आले.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा मतदारांवर काहीच प्रभाव पडला नसल्याचे ईशान्येकडील तीन राज्यांतील निकालावरुन स्पष्ट झाले आहे. काँग्रेसला यावेळी नागालॅण्डमध्ये खातेही उघडता आले नाही, तर भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्रिपुरामध्ये काँग्रेसने डाव्यांशी आघाडी करून निवडणूक लढवली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही.त्रिपुरात काँग्रेसला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. मेघालयमध्ये काँग्रेसची सर्वात वाईट कामगिरी दिसून आली आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने 30पेक्षा अधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र, यावेळी त्यांना केवळ पाचच जागा जिंकता आल्या आहेत.निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार नागालॅण्डमध्ये काँग्रेसला केवळ चार टक्के मते मिळाली आहेत. मेघालयमध्ये 13 टक्क्यांहून अधिक मतेे मिळाली आहेत. त्याचवेळी त्रिपुरामध्ये आठ टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने