बाळासाहेब थोरतांची विखेंवर जोरदार टीका, म्हणाले...



ब्युरो टीम : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आज संगमनेर मध्ये बोलताना जोरदार टीका केली आहे. 'अचानक मिळालेल्या मंत्रिपदामुळे काही लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेलेली आहे. अधिकारांचा वापर दंडेलशाही करण्यासाठी सुरू आहे. आपल्या राजकीय सुडापोटी जिल्ह्यातील विकासकामे आणि जनतेला वेठीस धरणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे, धमक्या आणि दादागिरी संगमनेर मध्ये चालणार नाही,' असे थोरातांनी ठणकावून सांगितानाच विखेंवर तोफ डागली आहे.

काँग्रेसने नगर ग्रामीण जिल्ह्याचे प्रभारी अध्यक्ष म्हणून राजेंद्र नागवडे यांची नियुक्ती केली आहे. त्यांचा आज संगमनेरमध्ये सत्कार करण्यात आला. त्यानंतर थोरात यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी थोरात म्हणाले, ‘लोकप्रतिनिधी या नात्याने प्रत्येक आमदाराला काही अधिकार दिलेले आहेत. नगर जिल्ह्यात विद्यमान पालक मंत्र्यांकडून या अधिकारांची पायमल्ली केली जाते आहे. लोकप्रतिनिधीला न कळवता परस्पर बैठका घेतल्या जात आहेत. आपल्या चेल्याचपाट्यांना हाताशी धरून अधिकारी आणि कंत्राटदारांना धमकावले जात आहे. कामे बंद पाडली जात आहे. चौकशीच्या धमक्या दिल्या जात आहेत. सरकारी बैठकांमध्ये, सार्वजनिक रित्या अपमानित करून धमकावले जात आहे. हे प्रकार अशोभनीय आहेत.'

'ज्यांना स्वतःच्या तालुक्यातले मुख्य रस्ते धड करता आले नाही, ते संगमनेरला येऊन बैठका घेतात आणि कामे बंद पाडतात हे हास्यास्पद आहे. जबाबदार मंत्री आणि नगर जिल्ह्यासारख्या सुजाण जिल्ह्याचे पालकमंत्री सांभाळणाऱ्या व्यक्तीने निदान बैठका घेताना आपल्या पदाचा तरी आब राखावा', असेही थोरात म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने