Borewell : दुर्देवी! बोअरवेलमध्ये पडून चिमुकल्याचा मृत्यू



ब्युरो टीम :अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील शेतातील बोअरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षाचा मुलगा पडून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. सागर बुधा बरेला असं या चिमुकल्याच नाव आहे. काल, सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला काढण्यासाठी प्रशासनानं युद्ध पातळीवर प्रयत्न केले. एनडीआरएफच्या पाच तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. परंतु मुलाला वाचवण्यात यश आले नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी सहाच्या सुमारास सागर हा बोअरवेलमध्ये पडला होता. त्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. या सर्व परिस्थितीवर तालुका प्रशासनही लक्ष ठेवून होते. बोअरवेलच्या १५ फूट खोलीवरती हा मुलगा असल्याचे जाणवल्याने त्याला वाचवण्यासाठी समांतर दोन जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू होते. घटनास्थळी कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपजिल्हा रुग्णालयाची टीम , कर्जत नगरपंचायतचे अग्निशमन दल यांच्यासह महसूल प्रशासन तळ ठोकून होते. एनडीआरएफच्या प्रयत्नामुळे ५ वर्षीय सागरला १५ फुटी बोअरवेलमधून रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आले. परंतु तोपर्य़ंत त्याचा मृत्यू झाला होता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने