Chinchwad Bypoll Election : चिंचवडमध्ये अश्विनी जगतापांचा मोठा विजय



ब्युरो टीम: चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक भाजपने जिंकली आहे. भाजपाच्या उमेदवार व  दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या निवडणुकीत तब्बल ३६ हजार ९१ मतांनी विजयी झाल्या आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया पार पडली. अखेर ही निवडणूक जगतापांनी जिंकली आहे. दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का बसला होता. पण चिंचवडची जागा राखण्यात पक्षाला यश आले आहे.

चिंचवड निवडणुकीत उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्येच बंडखोरी झाल्यामुळे ही तिरंगी लढत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्ये अश्विनी जगताप यांचा विजय झाला. राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडखोरीचा त्यांना फायदा झाला. या निवडणुकीत अश्विनी जगताप यांना १ लाख ३५ हजार ४३४ मते, राष्ट्रवादीचे नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मते तर राष्ट्रवादीतील बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४४ हजार ८२ मते मिळाली.

दरम्यान, विजयानंतर माध्यमांशी बोलताना विजयी उमेदवार अश्विनी जगताप यांनी सांगितलं की,’मी हा विजय सर्वसामान्य जनतेला आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित करते. भाजपाचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेला माझ्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद देते. अशा पद्धतीने निवडणूक लढवावी लागेल, असा विचार मी कधीच केला नव्हता. लोकांसाठीची लक्ष्मण जगताप यांची अपुरी राहिलेली कामं आहेत, ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.’

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने