Chitra Wagh : चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर टीका.. म्हणाल्या, त्यांची मती...



विक्रम बनकर, नगर : '103 दिवस तुरुंगात जाऊन  आल्याने संजय राऊत यांची मती गुंग झाली आहे. ते वाट्टेल ते खोटे आरोप आणि खोट्या पद्धतीचे ट्विट करीत आहेत,' अशी जहरी टीका भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ठाकरे  गटाचे नेते खासदार संजय राऊतावर केली आहे. 'संजय राऊत यांनी  महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे,' असेही वाघ म्हणाल्या. त्या नगरमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी बार्शीच्या प्रकरणावरून संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या, बार्शीच्या प्रकरणात ज्या दिवशी गुन्हा झाला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी दोन्ही  आरोपींना अटक झाली. हे दोन्ही आरोपी जेलमध्ये आहेत. असे असतानाही आरोपी फरार आहेत, असे खोटे संजय राऊत लिहितात. तसेच आरोपी भाजप पुरस्कृत आहेत, असे खोटे बोलतात. पण आरोपी हे भाजपच नाही, तर कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, असेही वाघ यांनी स्पष्ट केले. 

राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करा

चित्रा वाघ यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या, ‘संजय राऊत यांनी बार्शीच्या प्रकरणातील पीडित मुलीचा रक्तबंबाळ परिस्थितीमध्ये असलेला फोटो व्हायरल केला आहे. पीडितेचा फोटो त्यांनी कोणत्या अधिकारात व्हायरल केला? पीडितेचा फोटो हा व्हायरल करणे गुन्हा आहे. तरी राऊत यांच्यावर तात्काळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक यांनी गुन्हा दाखल करावा.’  

राज्य महिला आयोगावर साधला निशाणा

महिलांच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या आत्मसन्मासाठी, रक्षणासाठी महाराष्ट्रात महिला आयोग अस्तित्वात आहे का नाही? असा प्रश्न उपस्थित करताना चित्रा वाघ यांनी महिला आयोगावरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या,‘महाराष्ट्रात महिला आयोग अस्तित्वात असेल तर त्यांनी संजय राऊतांना फोटो व्हायरल बाबत विचारणा केली आहे का? महिला आयोगाने त्यांना नोटीस पाठवली आहे का? महिला आयोग फक्त आम्हाला नोटीस पाठवण्यासाठी आहे का ? याचे उत्तर आयोगाला द्यावे लागेल,’ असेही वाघ यांनी स्पष्ट केलं.

पहा व्हिडिओ



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने