CM Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी मनसे कार्यालयाला भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण



ब्युरो टीम : महाराष्ट्राच्या राजकरणात एक मोठी घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली येथील मनसे मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली आहे. राज ठाकरेंच्या सभेच्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी मनसे कार्यालयाला भेट दिल्याने आज राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज गुढी पाडव्यानिमित्त शिवतीर्थावर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार आणि कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. सभास्थळी जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच मुख्यमंत्री शिंदे यांनी आज मनसे कार्यालयात भेट दिली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत अधिक माहिती देताना मनसेचे आमदार राजू पाटील म्हणाले, 'आज पहिल्यांदा गणपती संस्थानच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले होते. त्यावेळी मीही तिथेच होतो. त्यांना मी विनंती केली की मनसेचं कार्यालय बाजुलाच आहे, येता का? यानंतर मुख्यमंत्र्यांनी काहीही वेळ न दवडता त्यांनी आमच्या विनंतीला मान देत मनसे कार्यालयाला भेट दिली. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. दिवसांतील २४ तास आणि वर्षातील १२ महिने कुणीही राजकारण करत नाही. काही गोष्टी संस्कृतीच्या आणि सामाजिक सलोख्याच्या असतात. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री मनसे कार्यालयात आले होते.'

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने