Congress : आज येथे काँग्रेस करणार बोंबाबोंब करत कचऱ्याची होळी,



ब्युरो टीम : 'मागील सुमारे दोन आठवड्यांपासून नगर शहराच्या जवळपास सर्व भागांमध्ये मनपाची कचरा संकलन घंटागाडी पोहोचलेली नाही. यामुळे नागरिकांच्या घरात कचरा साचला असून त्याची दुर्गंधी त्यांना सहन करावी लागत आहे. स्थानिक नगरसेवक, मनपा कर्मचारी, ठेकेदार प्रतिनिधी नागरिकांना फोन करून देखील कोणतीही दाद द्यायला तयार नाहीत. मनपाच्या कोलमडलेल्या यंत्रणेचा निषेध म्हणून नागरिकांनी आज (दि. ६) कचऱ्याची होळी करावी,' असे आवाहन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी नगरकरांना केले आहे. 

काळे म्हणाले की, 'आज होळीचा सण आहे. पण ऐन सणासुदीच्या दिवशी नागरिकांच्या घरांमध्ये कचऱ्यांचे ढीग लागले आहेत. घंटागाडीत मागील दोन आठवड्यांपासून दारात आलेली नाही. यामुळे विशेषतः महिला वर्गाची मोठी गैरसोय झाली आहे. इच्छा नसतानाही नागरिकांना रात्रीच्या वेळी नाईलाज म्हणून रस्त्यांवर कचरा टाकावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.'

दरम्यान मनपाच्या ढिसाळ कारभाराबाबत आज सायंकाळी काँग्रेस शहरात कचऱ्याची होळी करणार असून यावेळी मनपाच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन करणार आहे. नागरिकांनीही मनपाचा निषेध म्हणून आपापल्या दारासमोर कचऱ्याची होळी करत मनपाला वठणीवर आणण्यासाठी आंदोलन करावे, असे आवाहन काळे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने