ब्युरो टीम : देशात कोरोनाची रुग्णसंख्या रोज वाढत असल्यामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे. या पार्श्वभूमीवर काल, २२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. चाचण्या वाढवा, मास्क वापरा, रुग्णालयांनी वेळोवेळी मॉकड्रील घ्यावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना पंतप्रधानांनी आरोग्य यंत्रणेबरोबरच नागरिकांनाही केल्या आहेत.
देशातील कोविड-19 आणि एन्फ्लूएंझा या साथीच्या रोगांच्या परिस्थितीच्या सद्यस्थितीचं मूल्यमापन करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक झाली. आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि साधनसामुग्रीची तयारी, लसीकरण मोहिमेची स्थिती, कोविड-19 चे उद्भवणारे नवीन प्रकार आणि एन्फ्लूएंझाचे प्रकार आणि देशभरात होणारे त्यांचे सार्वजनिक आरोग्यविषयक परिणाम, यांचा आढावा घेणं हे या बैठकीचं उद्दीष्ट होतं. देशात गेल्या 2 आठवड्यांमध्ये, एन्फ्लूएंझा रोग्यांच्या संख्येनं घेतलेली मोठी उसळी आणि कोविड-19 च्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर, ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
भारतातील वाढत्या रुग्णसंख्येसह जागतिक कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेणारं एक सर्वंकष सादरीकरण, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या आरोग्य सचिवांनी यावेळी केलं. 22 मार्च 2023 रोजी संपलेल्या आठवड्यात, रुग्णांची दैनंदिन सरासरी संख्या 888 असून, रोगाची लागण होण्याचा साप्ताहीक दर 0.98 टक्के आहे आणि भारतामध्ये नव्या रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ होत असल्याची माहिती, पंतप्रधानांना यावेळी पुरवण्यात आली. तथापि, याच आठवड्यात जागतिक स्तरावर दररोज सरासरी 1 लाख 8 हजार रुग्णसंख्येची नोंद झाली हे सुद्धा पंतप्रधानांना सांगण्यात आलं.
कोविड-19 चा आढावा घेण्यासाठी 22 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या या आधीच्या शेवटच्या बैठकीत पंतप्रधानांनी दिलेल्या निर्देशांनुसार, पुढे काय कारवाई करण्यात आली याची माहितीही या बैठकीत देण्यात आली. 20 मुख्य कोविड औषधं, 12 इतर औषधं, 8 बफर औषधं आणि 1 इन्फ्लूएंझा औषधांची उपलब्धता आणि किंमतींवर लक्ष ठेवले जात आहे, अशी माहितीही त्यांना देण्यात आली. 27 डिसेंबर 2022 रोजी 22 हजार रुग्णालयांमध्ये एक मॉक ड्रिल अर्थात रंगीत तालीम सुद्धा देखील घेण्यात आली आणि त्यानंतर त्यानुसार रुग्णालयांनी अनेक उपाययोजना केल्या, हे सुद्धा पंतप्रधानांना सांगण्यात आलं.
विशेषत: गेल्या काही महिन्यांत H1N1 आणि H3N2 च्या मोठ्या संख्येनं आढळलेल्या रुग्णांच्या अनुषंगानं, देशातील एन्फ्लूएंझा रुग्ण परिस्थितीबद्दल पंतप्रधानांना माहिती देण्यात आली.
जिनोम सिक्वेंसिंग साठी नियुक्त केलेल्या INSACOG प्रयोगशाळांमध्ये, लागण झालेल्या नमुन्यांचं संपूर्ण जिनोम सिक्वेंसिंग वाढवण्याचे निर्देश पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिले. यामुळे विषाणूचे नवीन प्रकार उद्भवले असल्यास त्यांचा मागोवा घेण्यास आणि वेळेवर उपाय तसेच उपचार करण्यास मदत मिळू शकेल.
रूग्ण, आरोग्य व्यावसायिक आणि आरोग्य कर्मचारी या सर्वांनी, रुग्णालयाच्या आवारात मास्क घालण्यासह कोविड योग्य वर्तनाचं पालन करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेले रुग्ण गर्दीच्या ठिकाणी वावरत असताना, त्यांनी आणि सर्वांनी मास्क घालणं उपयुक्त आहे असही पंतप्रधानांनी यावेळी ठामपणे सांगितलं.
IRI/SARI रुग्णांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवण्यात यावं आणि एन्फ्लूएंझा, सार्स-सी ओ व्ही-2 आणि अदेनो विषाणूच्या चाचण्यांचा सर्व राज्यांनी पाठपुरावा करावा असे निर्देश त्यांनी दिले. रुग्णालयांमध्ये पुरेशा खाटा आणि आरोग्य कर्मचारीबळाच्या उपलब्धतेसह, एन्फ्लूएंझा आणि कोविड-19 साठी आवश्यक औषधं तसच साधनसामुग्रीची उपलब्धता निश्चित करण्याच्या गरजेवरही पंतप्रधानांनी भर दिला.
कोविड -19 हा साथीचा रोग संपलेला नाही आणि म्हणूनच त्या अनुषंगानं देशभरातील स्थितीवर नियमितपणे लक्ष ठेवणं आवश्यक आहे, असं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. चाचणी-पाठपुरावा-उपचार-लसीकरण आणि कोविड योग्य वर्तन ही पंचसूत्री राबवण्याच्या धोरणावर लक्ष केंद्रीत करणं पुढे सुरूच ठेवावं आणि सर्व गंभीर तीव्र श्वसन आजार (SARI) रुग्णांच्या चाचण्या आणि प्रयोगशाळांच्या माध्यमातून आढावा, वाढवण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला. आपली रुग्णालयं सर्व आरोग्य विषयक आणीबाणीसाठी सुसज्ज आहेत याची खातरजमा करण्यासाठी, मॉक ड्रिल्स म्हणजेच रंगीत तालमी नियमितपणे आयोजित केल्या पाहिजेत, असही ते म्हणाले.
नागरिकांनी, श्वसनविषयक स्वच्छतेचं पालन करावं आणि गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी कोविड योग्य वर्तनाचं पालन करावं असं कळकळीचं आवाहन, पंतप्रधानांनी केलं.
या बैठकीला, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी के मिश्रा, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल, कॅबिनेट सचिव राजीव गौबा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे सचिव, औषधं आणि जैवतंत्रज्ञान सचिव, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद-ICMRचे महासंचालक, पंतप्रधान कार्यालयाचे सल्लागार अमित खरे, आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा