Crime : 'या' जिल्ह्यात प्राध्यापकाच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक



विक्रम बनकर, नगर : नगर शहरातील केडगाव या ठिकाणी झालेल्या प्रा. शिवाजी किसन उर्फ देवा होले यांच्या हत्या प्रकरणात तीन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. अजय भाऊसाहेब चव्हाण (वय 25, रा. वळण पिंपरी, ता. राहुरी), सागर वसंत जाधव (वय 26, रा. वळण पिंपरी, ता. राहुरी), राजेंद्र भाऊसाहेब शिंदे (वय 27, रा. खेडले परमानंद, ता. नेवासा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या सराईत आरोपींनी लुटमारीच्या उद्देशाने ही हत्या केल्याचे तपासामध्ये उघड झाले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके तसेच या विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

नगर शहरामध्ये केडगाव बायपास या ठिकाणी 23 फेब्रुवारी रोजी हॉटेल के 9 समोर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करून होले यांना ठार मारले होते, या प्रकरणात अरुण शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या घटनेचा तपास करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांनी दिल्यानंतर दोन पथके विविध ठिकाणी या घटनेचा छडा लावत होते ,या संदर्भात वरील तीन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी संगमनेर तालुक्यातील साकुर या ठिकाणी भगवान पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना चाकूचा व गावठी कट्ट्याचा धाक दाखवून त्यांना लुटले होते. तसेच घारगाव शिवारातील लक्ष्मी टायर्सच्या दुकानात जबरी चोरी करून त्यांनी ऐवज लुटला होता, असे अधीक्षका म्हणाले. हे तीनही गुन्हेगार व्यसनाधीन असून अशाच प्रकारची लूटमार ते या अगोदर करत होते. आरोपींनी केडगाव येथे होले व शिंदे या दोघांना पाहिले व त्यांच्याकडे जाऊन त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला होले हे पळून जात होते. त्यामुळे या आरोपींना त्यांचा संशय आला व त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या देशी कट्ट्यातून गोळी झाडली. या घटनेमध्ये होले हे ठार झाले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला तपास करत असताना केडगाव बायपास या ठिकाणी झालेल्या खुनाचे काही धागेद्वारे हाती लागले. या घटनेत तीन आरोपी असल्याचे प्राथमिक तपासामध्ये आढळून आले. यातील आरोपी अजित चव्हाण हा राहुरी येथील असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून त्याला मोठ्या शिताफीने पकडले. त्यानंतर आरोपी अजय यांनी दिलेल्या माहितीवरून उर्वरित दोन आरोपींना पोलिसांनी वळण पिंपरी या ठिकाणाहून ताब्यात घेतले. या तिन्ही आरोपींकडे विचारपूस केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी या तिघांना अटक करून कोतवाली पोलीस ठाण्याच्या हवाली केले आहे. त्यांच्या ताब्यातून देशी कट्टा व इतर वस्तू हस्तगत केल्या आहेत. या घटनेत अन्य कोणाचा समावेश आहे हे सुद्धा पाहिले जाईल असे त्यांनी सांगितले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक अनिल कटके, सोपान गोरे, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, विशाल दळवी, रविकुमार सोनटक्के, दिपक शिंदे, सागर ससाणे, रोहित येमुल, रणजित जाधव, मयुर गायकवाड, मेघराज कोल्हे, भाग्यश्री भिटे, पोहेकॉ उमाकांत गावडे, संभाजी कोतकर व भरत बुधवंत या पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने ही कारवाई केली. या घटनेतील आरोपी अजय भाऊसाहेब चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 11 स्वरूपाचे गंभीर गुन्हे पुणे नगर व अन्य जिल्ह्यांत दाखल आहेत. तर सागर जाधव याच्यावर राहुरी तालुक्यात दोन गुन्हे दाखल आहेत. या आरोपींनी गुन्ह्यांमध्ये जी दुचाकी गाडी वापरली ती चोरीची असल्याचेही तपासामध्ये उघड झाले.

पहा व्हिडीओ




0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने