ब्युरो टीम : छत्तीसगडमधील बिलासपूर येथे धक्कादायक घटना समोर आलीय. येथे एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीचा खून करून मृतदेह लपविण्यासाठी तिच्या शरीराचे टाइल कटिंग करण्याच्या मशीनने 6 तुकडे केले, व हे सर्व तुकडे घरामध्येच पाण्याच्या टाकीत लपवून ठेवले. सती साहू असे मयत महिलेचं नाव आहे. तर, तिचा खून करणारा आरोपी पवन सिंहला पोलीस दुसऱ्या एका गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी गेले होते. तेव्हा खुनाचा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
आरोपीनं त्याच्या पत्नीची हत्या ही 6 जानेवारी 2023 ला केली होती. त्यानंतर त्याने तब्बल दोन महिने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे हे घरामध्येच ठेवले होते. पोलिसांनी पवन सिंहला अटक केली आहे. ‘आजतक’ने याबाबत वृत्त दिलंय. बिलासपूर शहरातील उसलापूर भागातील ही घटना आहे. पवनने त्याच्या आवडत्या मुलीशी लग्न केलं होतं, व तिचाच त्यानं निर्घृण खून केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखा प्लॅन केला होता. पत्नीला मारल्यानंतर त्यानं प्रथम टाइल कटिंग मशीनने तिच्या मृतदेहाचे 6 तुकडे केले. त्यानंतर हे तुकडे हवाबंद पॉलिथिनमध्ये पॅक करीत ती पिशवी डक्ट टॅपच्या मदतीनं बंद केली, व पाण्याच्या टाकीत पॉलिथिन लपवून ठेवले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर येईपर्यंत म्हणजेच जवळपास पुढील 2 महिने पवन हा मृतदेहासोबत घरात आरामात राहत होता.
मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्याचे नियोजन होते, असे आरोपीने पोलिसांना सांगितले. पण त्याला त्यासाठी योग्य वेळ मिळाली नाही. कारण तो ज्या घरात राहत होता, तिथे काम सुरू होते. त्यामुळे त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची संधी मिळू शकली नाही. त्याचवेळी बनावट नोटा प्रकरणी पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून त्याला पकडले आणि या खुनाचा उलगडा झाला.
असा झाला खुनाचा उलगडा
याप्रकरणी अतिरिक्त पोलीस अधिक्षक राजेंद्र जयस्वाल यांनी सांगितलं की, ‘आरोपीला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यामुळे त्याने तिचा खून केला. दोन महिन्यांपूर्वी त्याने ही हत्या केली होती. पण, हे अतिशय आश्चर्यकारकपणे समोर आले आहे. खरतर आरोपी पवनचा शोध हा बनावट नोटा छापण्यासाठी आणि आसपासच्या परिसरात वापरण्यासाठी पोलीस घेत होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीच्या घरी छापा टाकला, व घराची झडती घेत असताना त्यांना पाण्याच्या टाकीत मृतदेहाचे तुकडे दिसले. याप्रकरणी आरोपीकडे चौकशी केली असता, त्यानं सांगितलं की, हा मृतदेह त्याची पत्नी सती साहू हिचा आहे. हे ऐकून पोलिसांना धक्काच बसला आणि त्यांनी तात्काळ मृतदेहाचे तुकडे ताब्यात घेतले, व पोस्टमॉर्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केलाय.’
टिप्पणी पोस्ट करा