ब्युरो टीम : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या रविवारी नगर जिल्ह्यामध्ये येणार आहेत. यावेळी फडणवीस यांचे नगर जिल्ह्यात येण्याचे कारण खास आहे. ते कोणत्याही राजकीय कार्यक्रमासाठी नाही, तर एक सत्कार स्वीकारण्यासाठी येणार आहेत.
फडणवीस यांनी बहुप्रतीक्षित अशा साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणास मान्यता दिली, तसेच सर्वेक्षणास दोन कोटी रूपयाचा निधी देखील मंजूर केल्या बद्दल, त्यांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन येत्या रविवार दुपारी एक वाजता करण्यात आले असल्याचे खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. या बरोबरच शेतकऱ्यांचा आत्मा असलेल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांचाही सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. हे दोन्ही नागरी सत्कार समारंभ नगर तालुक्यातील रूईछत्तीसी या ठिकाणी संपन्न होणार असून जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील,आमदार बबनराव पाचपुते,मोनिका राजळे, राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या नागरी सत्कार कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते,भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार विखे पाटील यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा