Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्याचा सण का साजरा करतात? आरोग्याच्या दृष्टीने महत्व काय? जाणून घ्या



ब्युरो टीम : हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढी पाडवा साजरा केला जातो. यंदा गुढी पाडवा उद्या, 22 मार्चला साजरा होत आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इ. गोष्टी केल्या जातात. 

महाराष्ट्रात या दिवशी लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा इतर भारतीय प्रांतांत चेटी चांद, उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला 'गुढीपाडवा' म्हणतात.

काय सांगितली जाते कथा?

महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात.महाभारतातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात. ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्व निर्मिले, असे मानले जाते.

तसेच, शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने गुडी पाडव्याच्या दिवशी शकांचा पराभव केला. अशी आजच्या दिवसाची आख्यायिका प्रचलित आहे.

आरोग्यदृष्ट्या गुढीपाडव्याचे महत्त्व काय?

चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. त्यामुळे पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे,धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधीगुण या कडुलिंबाच्या अंगी आहेत. शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने