H3N2 Virus : इन्फ्लुएन्झाने 'त्या' रुग्णाचा कसा झाला मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं घटनाक्रम



विक्रम बनकर, नगर : एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झामुळे अहमदनगरमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला या विद्यार्थ्याचा  मृत्यू कसा झाला, याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली आहे.

डॉ. संजय घोगरे म्हणाले...

'वैद्यकीय महाविद्यालयाचा हा विद्यार्थी २ ते ६ मार्च या काळात अलीबागला सहलीला गेला होता. तेथून आल्यानंतर ७ तारखेला त्याने होळीचा सण साजरा केला. १० तारखेला त्याला ताप आणि सर्दी खोकला अशी लक्षणे दिसू लागली. ११ मार्चला सकाळी त्याने त्याच्याच महाविद्यालयातील हॉस्पिटलमध्ये तपासून घेतले. तिथे बाह्यरुग्ण म्हणून उपचार घेतले. त्याला तेथे दाखल होऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्याने त्याला नकार दिला. रात्री पुन्हा त्रास होऊ लागल्याने तो रुग्णालयात गेला. तेव्हा त्याला पुन्हा दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र, छत्रपती संभाजीनगरहून आपले नातेवाईक येत आहेत, असे सांगून त्याने तेव्हाही दाखल होण्यास नकार दिला. शेवटी रात्री रुग्णालयाने त्याला दाखल करून घेतले. दुसऱ्या दिवशी त्याचे पालक आले. त्यांनी दुपारी नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेव्हा त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. तिथे त्याच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यावेळी त्याला कोविड आणि एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झा याचे मिक्स इन्फेक्शन असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याची प्रकृती झपाट्याने खालावत होती. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला,' अशी माहिती डॉ.घोगरे यांनी दिली. 

दरम्यान, एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झामुळे राज्यातील पहिला मृत्यू नगरमध्ये झाला. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय घोगरे यांनी आज तातडीने डॉक्टरांची बैठक घेऊन उपाययोजना सुरू करण्याच्या सूचना केल्या.

पहा व्हिडिओ:



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने