Happy Holi : होळीला जिलेबी खायचा विचार करताय? जाणून घ्या या पदार्थाचा जन्म कुठं झालाय


ब्युरो टीम : उद्या होळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होईल. होळीच्या  दिवशी पुरणाची पोळी करण्याची परंपरा आहे. परंतु आजच्या जमान्यात पुरणाच्या पोळी ऐवजी अनेकजण होळीच्या दिवशी श्रीखंड, जिलेबी आदी गोड पदार्थ खातात. मात्र तुम्हाला माहिती आहे का, यातील जिलेबी या पदार्थाचा जन्म कुठे झाला आहे? याबाबतच आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

कधीही, कुणालाही खायला आवडणारा पदार्थ म्हणजे जिलेबी. पण तो फक्त भारतामध्येच नाही, तर सगळ्या जगानं जिलेबीला आणि जिलेबीनं सगळ्या जगाला आपलेसं केलंय. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, हा पदार्थ आपल्या देशात बहुतांश भागात सहजासहजी मिळत असला तरी प्रत्यक्षात तो भारतातील नाही. 

जिलेबीचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. गोड खाण्याची इच्छा झाल्यास हा पदार्थ अनेकांची पहिली पसंती असतो. देशातील जवळपास प्रत्येक शहरात जिलेबी सहज मिळते. देशात क्वचितच असं शहर असेल जिथे हा पदार्थ मिळत नाही. दिसायला एकदम गोलाकार, चवीला गोड व खुसखुशीत जिलेबी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. कुठे रबडी जिलेबीसोबत खाल्ली जाते,  तर काही ठिकाणी ती दूध आणि दह्यासोबत खाल्ली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, बांगलादेश, इराण व विविध अरब देशांमध्ये हा लोकप्रिय पदार्थ आहे. जिलेबी जरी भारताची राष्ट्रीय मिठाई मानली जातं असली, तरी तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा पदार्थ मुळ भारतातील नाही. ही मिठाई परदेशातील आहे, जी आज भारताच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध आहे.

काय आहे जिलेबीचा इतिहास?

जिलेबी अनेकांना आवडते. काही लोक पनीर किंवा खवा जिलेबी आवडीनं खातात. पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात हा पदार्थ खाण्याची एक वेगळीच मजा असते. जिलेबीचा इतिहास आजपासून सुमारे 500 वर्षांचा आहे. हा पदार्थ इराणमध्ये, ‘जलेबीला’, ‘जुलाबिया’ किंवा ‘जुलुबिया’ म्हणून ओळखला जातो. तुर्की आक्रमकांसोबत हा पदार्थ भारतात पोहोचला. यानंतर जिलेबीचं नाव, बनवण्याची पद्धत आणि त्याची चव बदलत राहिली. भारतात 15 व्या शतकापर्यंत हा पदार्थ प्रत्येक सणात वापरला जाणारा खास पदार्थ बनला होता. अगदी मंदिरात प्रसाद म्हणून तो दिला जात होता. ‘जिलेबी’ हा शब्द अरबी शब्द 'जलेबिया' किंवा फारसी शब्द 'जलिबिया' यावरून आलाय. 'किताब-अल-ताबिक' या मध्ययुगीन पुस्तकात 'जलाबिया' नावाच्या गोड पदार्थाचे वर्णन आहे. हा शब्द पश्चिम आशियातून आलाय.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने