Journalist : 'या' जिल्ह्यात होणार राज्यातील पत्रकार मेळावा, रोहित पवार स्वागताध्यक्ष



ब्युरो टीम: मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार आणि मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका अध्यक्षांचा मेळावा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे  ७ एप्रिल २०२३ रोजी संपन्न होत असल्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी केली आहे. यापुर्वी हा सोहळा चाकूर येथे होणार होता. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे चाकूर ऐवजी कर्जतला हा सोहळा संपन्न होत आहे. आमदार रोहित पवार हे मेळाव्याचे स्वागताध्यक्ष असतील.

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तालुका पत्रकार संघांना वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराने आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराने गौरविण्यात येते. पुरस्कार वितरण सोहळे प्रामुख्याने ग्रामीण भागातच घेतले जातात. यावर्षी हा सोहळा नगर जिल्ह्यातील कर्जत येथे होत आहे. ७ एप्रिल रोजी सकाळी १०. ३० वाजता पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू होईल. या मेळाव्यासाठी राज्यभरातून किमान ६०० प्रतिनिधी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. तसे नियोजन कर्जत आणि जामखेड येथील संयोजन समिती संयुक्तरित्या करीत आहे. मेळाव्यास पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन  मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, पुणे विभागीय सचिव अरूण तथा नाना कांबळे यांनी केलं आहे.

दरम्यान, हा सोहळा घेण्याची संधी अहमदनगर जिल्ह्याला दिल्याबद्दल परिषदेचे सरचिटणीस मन्सुरभाई शेख यांनी जिल्ह्याच्या वतीने परिषदेचे नेते एस.एम. देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, मिलींद अष्टीवकर, विजय जोशी, आदी पदाधिकाऱ्याचे आभार मानले असून आम्ही राज्यातील पत्रकारांच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचे मन्सुरभाई शेख यांनी सांगितले.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने