ब्युरो टीम : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे राज्यातील तालुका पत्रकार संघाचा राज्यस्तरीय मेळावा आणि आदर्श तालुका, जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा दि ७ एप्रिल २०२३ रोजी कर्जत (जिल्हा अहमदनगर) येथील शारदाबाई पवार सभागृहात होणाऱ आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी शुक्रवारी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. या मेळाव्याच्या संयोजनाची जबाबदारी कर्जत आणि जामखेड येथील पत्रकारांनी संयुक्तपणे घेतली आहे. मेळावा यशस्वी करण्यासाठी श्री. देशमुख यांनी सूचना केल्या. मेळाव्यास तालुका, जिल्हाध्यक्ष तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी एस.एम.देशमुख यांनी केले..
कार्यक्रम कर्जत येथे होत असला तरी कर्जत आणि जामखेडच्या पत्रकार संघांनी यजमानपद स्वीकारलेलं आहे.. त्यासाठी तालुक्यातील पत्रकारांनी विविध समित्या स्थापन करून कामांचे वाटप केले आहे. त्यानुसार जोरदार तयारीही सुरू केली आहे.
एस.एम देशमुख यांच्या समवेत ज्येष्ठ पत्रकार शोभनाताई देशमुख, राज्य सरचिटणीस मन्सूरभाई शेख, डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, बीड जिल्हाध्यक्ष जितेंद्र शिरसाट, बीड जिल्हा कार्याध्यक्ष दिनकर शिंदे, ज्येष्ठ पत्रकार विजयसिंह होलम, आदीसह कर्जत मधील पत्रकार गणेश जेवरे, आशिष बोरा, योगेश गांगर्डे, भाऊसाहेब तोरडमल, मच्छिंद्र अनारसे, मोतीराम शिंदे, अस्लम पठाण, जामखेडचे पत्रकार अविनाश बोधले, सुदाम वराट, अशोक वीर, किरण रेडे, पप्पूभई सय्यद आदी उपस्थित होते. दिनांक २४ मार्च २०२३ रोजी देशमुख यांच्यासह सर्वांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी करताना राज्यभरातून येणाऱ्या पत्रकाराच्या राहण्यासह इतर व्यवस्थेचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचे आमदार रोहित पवार हे स्वागताध्यक्ष आहेत. त्यांनीच कर्जत येथे हा कार्यक्रम कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयातील शारदाबाई पवार सभागृहात व्हावा, यासाठी आग्रह धरला. या सभागृहाचे उपस्थित सर्वांनीच कौतुक करत तालुका स्तरावर इतके सुंदर सभागृह ग्रामीण भागात कुठेही नसल्याचे म्हटले. या पाहणी नंतर बैठक झाली. यावेळी गणेश जेवरे यांनी सूत्रसंचलन केले एस एम देशमुख यांनी बोलताना संघटनेचे महत्व सांगितले. ते म्हणाले, 'मराठी पत्रकारांची ही देशातील एक नंबरची संघटना आहे. पत्रकारांच्या संघटना अनेक असल्या तरी पत्रकाराचे प्रश्न समान आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येत हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत..,' यावेळी त्यांनी कार्यक्रमाचे स्वरूप विषद केले. शेवटी आशिष बोरा यांनी कर्जत तालुक्यातील विविध देवस्थान व पर्यटन स्थळाची माहिती देऊन सर्वाचे आभार मानले. कर्जत तालुक्यात होणाऱ्या राज्यस्तरीय या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी सर्वजण सहकार्य करतील असा विश्वास कर्जत मधील पत्रकारांनी उपस्थित सर्वांना दिला.
टिप्पणी पोस्ट करा